Join us

डोंबिवलीत फेरीवाले रोजगार हक्क रॅलीतून करणार केडीएमसीच्या आयुक्तांना निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 17:37 IST

ठळक मुद्देपुढील आठवड्यात रॅलीचे नियोजन फेरीवाल्यांचा निर्धार१५० मीटरच्या रेषा अद्यापही मारलेल्या नाहीत

डोंबिवली: पोलिस यंत्रणा गुन्ह्याची भाषा करते, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी वेळकाढू पणा करतात, आयुुक्त पी.वेलरासू वेळ देत नाहीत अशा सर्व स्थितीत जगायचे कसे? असा सवाल फेरीवाल्यांनी केला. १५० मीटरच्या रेषा अद्यापही मारलेल्या नाहीत. जे राजकीय पक्ष आमच्या विरोधात आंदोलने करतात ते आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी कच खातात हे योग्य नाही. कायद्याचीच भाषा असेल तर आता आम्ही रोजगार हक्क रॅली काढतो आणि केडीएमसी आयुक्तांसह कुचकामी यंत्रणांचा निषेध करणार असल्याचा ठराव फेरीवाल्यांनी केला.रामनगर पोलिसांनी गुरुवारी फेरीवाल्यांना पोलिस ठाण्यात बोलावून तंबी दिली होती. त्यानंतर फेरीवाले एकत्र आले, आणि कायद्याच्या चौकटीत जे करता येइल ते सर्व करायचे असे ठरवल्याचे कष्टकरी हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे म्हणाले. त्यामुळे नियोजन झाले तर आता पुढील आठवड्यातच रोजगार हक्क रॅली काढायची. डोंबिवलीत काढायची की कल्याणमध्ये आणि सकाळी की संध्याकाळी हे ठरवणे सुरु आहे. सातत्याने आम्हाला लक्ष्य केले जाते, पण आम्हाला पर्यायी जागा मात्र कुठेही दिली जात नाही. त्यामुळे आमच्या कुटूंबियांवर बरोरोजगारीची कु-हाड आली आहे. चार महिने होत आले, आधी पावसामुळे तर आता न्यायालयाच्या आदेशांमुळे व्यवसाय होत नाही. खायचे काय आणि जगायचे कसे? आम्हाला मुल, बायका आहेत. त्यांचे हाल होतात, त्यांच्या अपेक्षा आहेतच ना? रितसर व्यवसायच करतो ना. पण महापालिका प्रशासनाच्या आडमुठया धोरणाचा आम्हाला प्रचंड त्रास होत असून आमची कुचंबणा होत आहे. आणखी किती दिवस असेच सुरु राहणार आहे असा सवालही त्यांनी केला. रोजगार रॅलीतून संताप व आक्रोश व्यक्त केला जाणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :कल्याण डोंबिवली महापालिकाडोंबिवलीकल्याण