Join us  

डोंबिवलीत आगरी - केरळा महोत्सवात महिलांनी व्यक्त केल्या भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 4:11 PM

डोंबिवलीत आगरी केरळा महोत्सवाच्या निमित्ताने स्त्री धर्म, स्त्रियांचे प्रश्न या विषयावर परिसंवादाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते.त्या परिसंवादात प्रख्यात स्त्रिीरोग तज्ञ,डॉक्टर संगीता डाके, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका दिपाली काळे, उद्योजिका पूजा रसाळ, एकल महिला संघटना या सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा भारती मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्राची गडकरी यांनी मान्यवरांची मुलाखत घेत त्यांना दिलखुलास मते मांडण्यासाठी बोलते केले.

ठळक मुद्देविज्ञान युग आले पण समाजाच्या बुरसटलेल्या मानसिकतेचे काय?स्त्री धर्म, स्त्रियांचे प्रश्न या विषयावर परिसंवादाचे आयोजन

डोंबिवली: विज्ञान युगाचा डंका पिटला जातोय खरा पण ख-या अर्थाने भारतातील नागरिकांमध्ये स्त्री- पुरुष समानता आहे का? की आजही बुरसटलेल्या विचारांनीच महिलांना वागणूक दिली जातेय. आर्थिक विषमतेसोबतच एकाकी पडलेल्या महिलांना कोणी वाली नाही का? त्यांच्या भावना, त्यांची मत, त्यांचे विचार यासह त्यांना समाजात खरच स्थान आहे का? याचा अंतर्मुख होऊन कोणी विचार करत आहे की नाही? महिलांनी तरी असा विचार करु नये, त्यांनी आपल्या सभोवताली असणा-या महिलांना समानतेची वागणूक दिली, आणि अन्यायाला वाचा फोडली तरी देशातील महिला अत्याचारांचे प्रश्न मार्गी लागतील. त्यासाठी एकमेकींना सहकार्य करण्यासाठी पुढे या असे आवाहन महिलांनीच महिलांना उद्देशून केले. डोंबिवलीत आगरी केरळा महोत्सवाच्या निमित्ताने स्त्री धर्म, स्त्रियांचे प्रश्न या विषयावर परिसंवादाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते.त्या परिसंवादात प्रख्यात स्त्रिीरोग तज्ञ,डॉक्टर संगीता डाके, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका दिपाली काळे, उद्योजिका पूजा रसाळ, एकल महिला संघटना या सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा भारती मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. त्या सगळयांनी आपापली मते व्यक्त करतांना महिलांनीच पुढे यावे, स्वताला सिद्ध करावे, एकटे समजू नये. अन्यायाला वाचा फोडावी. विज्ञान युगातील विविध आयामांचा वापर करावा, आणि जेथे कमतरता भेडसावेल तेथे समुहाने पुढे यावे असे आवाहन मान्यवरांनी केले. प्राची गडकरी यांनी मान्यवरांची मुलाखत घेत त्यांना दिलखुलास मते मांडण्यासाठी बोलते केले. तासभर हा उपक्रम सुरु होता, त्यास उपस्थितांनीही प्रचंड दाद दिली.मोरे यांनी समाजातील एकल महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडली, त्यांच्या समोरील आव्हाने, समाजाची बुरसटलेली मानसीकता यावर टिकेची झोड घेत परिवर्तनाची आवश्यकता असल्याचे म्हंटले. त्या म्हणाल्या की समाजात अनेकदा विधवा महिला, घटस्फोटीत महिला यांच्याकडे बघण्याची दृष्टीच वेगळी असते. पण ज्या महिलांवर अशी वेळ आली आहे, त्यात त्यांचा दोष किती असतो याचा विचार का केला जात नाही. विधवा महिलांना समाजात आजही मान नाही. कौटुंबिक सोहळयांमध्ये त्यांना डावलले जाते हे कितपत योग्य आहे. साध हळदी कुंकु समारंभात त्यांना बोलावले जात नाही, एखादीने हिंमत केलीच तर अन्य महिला त्यास घालुनपाडुन बोलतात, त्यामुळे परिवर्तन होणार तरी कसे? असा सवाल त्यांनी केला. तशीच काहीशी अवस्था ही घटस्फोटीत महिलांची होते. पण त्यात त्यांचा दोष किती असतो, आणि असला तरी तो त्यांचा वैयक्तिक भाग झाला? त्याचे पडसाद समाजात का उमटावे असा सवाल करत त्यांनी मानसिकता बदलणे खूप गरजेचे असल्याचे म्हंटले.दिपाली काळे यांनी युवकांमध्ये लैगिंक शिक्षणाची नितांत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. देशात काय आणि जगात काय महिलांवर - युवतींवर होणा-या अत्याचाराच्या प्रमाणात युवकांचे विशेषत: अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग आहे. हे भयंकर असून समाज, संस्कृति, संस्कार या सगळयाची पायमल्ली झाली आहे. त्या सद्गुणांना आपणच तिलांजली दिली आहे. व्हाट्सअ‍ॅपवर आलेल्या पोस्ट, व्हिडिओ, फोटो याचा विचार केल्यावर आणि वस्तूस्थितीचा अभ्यास केल्यावर लैगिंक शिक्षणाच्या महत्व आपल्या सगळयांच्या लक्षात येईल. युवकांचे मोबाइल कधी पालक सहज म्हणुन चेक का करत नाहीत, ते केल्यास विदारक सत्य बाहेर येइल. सगळेच तसे असतील अस नाही पण बहुतांशी युवकांमध्ये युवतींमध्ये लैंगिक शिक्षणाची नितांत गरज असल्याचे त्या म्हणाल्या. काय बघावे काय बघू नये याचे सेन्सॉर आधी घराघरांमधूनच निर्माण व्हायला हवेत, पण ते होत नाही. पालकांना पाल्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पुणे असो की मुंबई जो तो घड्याळळ्याच्या काट्यानूसार धावत असतो. त्यामुळे कोणालाही कोणासाठी वेळ नाही. नेमका याचाच फायदा मुले घेतात आणि दुर्लक्ष केले की त्याचे नको ते पडसाद उमटतात. वेळ गेल्यावर काही करता येत नाही, त्यासाठी आतापासूनच काय ते करावे अन्यथा पुढचा काळ भयंकर असल्याचे त्या म्हणाल्या. लैंगिक शिक्षणातून निदान जनजागृती होइल, कोणकोणत्या वयात काय काय बदल होतात याबद्दलची माहिती होईल, नको त्या वयातील आकर्षण, प्रलोभन आदींची माहिती मुलांना असायला हवी, त्याबद्दलच्या मर्यादांबाबतही माहिती हवी असेही मत त्यांनी व्यक्त केले.डॉ. डाके यांनी मोनोपॉझ संदर्भातील महिलांची मानसीकता, चिडचिडेपणा याबद्दल जनजागृती होणे आवश्यक असून महिलांच्या वयानुरुप बदलणा-या हार्मोन्सच्या काळात त्यांना कुटुंबाने साथ द्यायला हवी. त्यासाठी कौटुंबिक सलोखा असणे आवश्यक आहे. बहुतांशी घरांमध्ये तो दिसत नाही, आणि मग घरांघरांमध्ये आपापसातील दरी वाढत जात असल्याचे सांगण्यात आले. हे सशक्त समाजाचे लक्षण नाही. त्यासाठी सार्वत्रिक विचार व्हायला हवा. बदल व्हायलाच हवेत असेही त्या म्हणाल्या. आधी आजी -आजोबा घरांमध्ये असायचे पण आता बहुतांशी घरात नसतात त्यामुळेही अनेक समस्या वाढत असून संस्कार आवश्यक असतता ते होत नाहीत हे गंभीर असल्याचे सांगण्यात आले.उद्योजिका पूजा यांनी महिलांनी स्वावलंबी व्हावे, स्वत:च्या पायावर उभे रहावे असे स्पष्ट केले. स्वत:ला प्रुव्ह करायला लागेल, त्याशिवाय समाजाला किंमत कळत नाही. पण एकदा का आत्मविश्वास मिळाला की मग मागे बघायचे नाही. किंबहूना मागे बघितलेच जात नाही, कारण विविध विषय, आव्हाने, व्यक्ती, स्वभाव आदींना सामोरे जाण्याची ताकद आपल्याला आपोआपच मिळते. पण त्यासाठी कष्ट, जिद्द, चिकाटीची नितांत गरज असल्याचे त्या म्हणाल्या. सुदैवाने महिलांमध्ये कुटुंबवत्सलता, जिद्द, कष्ठ करणे हे गुण असतातच. केवळ हिंमत वाढवावी लागते. ती एकदा केली, आणि योग्य शिक्षण घेतले की व्यवसाय करायचा आणि पुढचे पाऊल आत्मविश्वासाने टाकायचे. विविध भेडसावणा-या समस्या काहीच नसून करण्यासारख जगात भरपूर काही असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकदा महिलांनी आत्मविश्वासाने पुढे यायचे ठरवले तर मग आपोआपच परिस्थिती बदलते. काही वेळा त्यास वेळ लागतो तर काही वेळात ते लगेच होतेही. त्यामुळे महिलांनी खचून न जाता येईल त्या प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी आणि पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :डोंबिवलीअमृता फडणवीसकल्याण