Join us  

सावरकरांबद्दल काँग्रेसनं जे लिहिलंय ते शिवसेनेला मान्य आहे का?; फडणवीसांचा आक्रमक पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 3:18 PM

भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या शिदोरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल छापून आलेल्या लेखांवरून हल्लाबोल केला आहे.

ठळक मुद्देफडणवीस यांनी काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या शिदोरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल छापून आलेल्या लेखांवरून हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत शिदोरीमध्ये छापून आलेल्या लेखांवरून काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला आहे.काँग्रेसनं राष्ट्रपुरुषांच्या अपमानाची मालिका सुरू केलेली आहे. ती अत्यंत निषेधार्ह आहे.

मुंबईः भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या शिदोरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल छापून आलेल्या लेखांवरून हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत शिदोरीमध्ये छापून आलेल्या लेखांवरून काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला आहे. काँग्रेसनं राष्ट्रपुरुषांच्या अपमानाची मालिका सुरू केलेली आहे. ती अत्यंत निषेधार्ह आहे. मध्य प्रदेशमधल्या छिंदवाड्यामध्ये आमच्या सगळ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची वाताहत आणि विटंबणा करण्यात आली. त्याचा भारतातील प्रत्येक व्यक्ती निषेध करतो आहे. छत्रपतींचा हा अपमान भारत देश कधीच सहन करणार नाही. याबाबत मध्य प्रदेश सरकारनं माफी मागितली पाहिजे. त्याठिकाणी महाराजांचा पुतळा पूर्ण सन्मानानं उभा केला पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत. काँग्रेस पक्षाचं मुखपत्र असलेल्या शिदोरीतून 8 फेब्रुवारीच्या अंकात पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अतिशय गलिच्छ अशा प्रकारचे लेख लिहिलेले आहेत. ज्या प्रकारे मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसनं सावरकरांवर गलिच्छ लिखाण केलं. महाराष्ट्रातही तशाच प्रकारचं गलिच्छ लिखाण स्वातंत्र्यवीर सावरकरांवर करण्याचं काम होतंय, असं म्हणत फडणवीसांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या शिदोरीतून शिवसेनेबद्दल मांडलेल्या मताचाही फडणवीसांनी उल्लेख केला आहे. कोणत्याही प्रकारच्या अभ्यासाचे आणि अभ्यासावर आधारित वस्तुनिष्ठ माहितीचे वावडे असलेल्या शिवसेनेलाही स्वातंत्र्यवीर सावरकर तेवढेच प्रिय आहेत, शिवसेनेसारख्या पक्षानं केवळ उथळ भावनिक राजकारण करण्यापेक्षा विषय नीट समजावून घेऊन भूमिका घेतली पाहिजे. नाहीतर महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणात अनेक गफलती होत राहतील, असासुद्धा काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या शिदोरीच्या लेखात उल्लेख असल्याचं फडणवीसांनी अधोरेखित केलं आहे. शिवसेनेबद्दल विचार मांडत असताना अतिशय गलिच्छ लिखाण करण्यात आलं आहे. इतिहासाची माहिती न घेतलेल्या बिनडोकांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं तेजोभंग करण्याचा प्रयत्न केलाय. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेस पार्टी अशा पद्धतीचं लिखाण करणार असेल, तर भारत देश आणि विशेषतः महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही. शिवसेनेला हे लिखाण मान्य आहे का?,  शिवसेनेला हे लिखाण मान्य नसेल तर उद्धवजी काय भूमिका घेणार आहेत. काँग्रेस पक्षानं शिदोरीतले हे लेख मागे घेतले पाहिजे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींची माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्रानं शिदोरी या मासिकावर बंदी घालावी, अशी मागणी मी पत्राद्वारे उद्धव ठाकरेंकडे करणार आहे.शिवसेनेनं या मासिकावर बंदी घातली नाही, तर अतिशय तीव्र पावलं उचलून स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानणारा वर्ग मैदानात उतरेल. सत्तेसाठी किती लाचार राहणार आहात याचंसुद्धा उत्तर जनतेला मिळालं पाहिजे. मध्य प्रदेशातील घाण मध्य प्रदेशात ठेवा असं म्हणणाऱ्यांनाही माझा सवाल आहे की, ही घाण महाराष्ट्रात आल्यानंतर काय भूमिका घेणार आहात, याचंसुद्धा उत्तर मिळालं पाहिजे. ही सत्तेची लाचारी स्वातंत्र्यवीरांचा अपमान करणारी असल्यास महाराष्ट्र ती कधीही सहन करणार नाही. शिदोरीवर तात्काळ बंदी घालावी असं आमचं म्हणणं आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीस