Join us  

माणसांच्या आयुष्याला काही किंमत नाही का?- उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 5:27 AM

शुक्रवारच्या सुनावणीत म्हाडाने न्यायालयाला सांगितले की, संपूर्ण इमारतीभोवती बॅरिकेड्स घातले असून पादचारी आणि वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला आहे.

मुंबई : माणसाच्या आयुष्याला काही किंमत नाही का? अशा शब्दांत उच्च न्यायालयाने म्हाडाची खरडपट्टी काढली. अद्याप एस्प्लनेड मॅन्शन पूर्णपणे सुरक्षित करण्यात आली नसल्याने उच्च न्यायालयाने म्हाडाला सुनावले.गेल्या महिन्यात न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. गौतम पटेल यांनी एक्प्लानेड मॅन्शनभोवती बॅरिकेड्स टाकण्याचे निर्देश दिले होते.शुक्रवारच्या सुनावणीत म्हाडाने न्यायालयाला सांगितले की, संपूर्ण इमारतीभोवती बॅरिकेड्स घातले असून पादचारी आणि वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला आहे.इमारतीच्या वरच्या मजल्यांवरील जो भाग लटकत आहे, तो भाग बॅरिकेड्सच्या आतल्या भागात पडेल की रस्त्यावर पडेल, असा प्रश्न उच्च न्यायालयाने म्हाडाचे वकील पी. जी. लाड यांना केला. त्यावर त्यांनी डेब्रिज रस्त्यावर पडेल, अशी माहिती न्यायालयाला दिली.‘संपूर्ण इमारतीला नेट लावा. माणसाचे आयुष्य म्हणजे तुमच्यासाठी काहीच नाही का? आतापर्यंत तुम्ही हे काम पूर्ण करायला हवे होते. इमारतीचा मोडकळीस आलेला भाग म्हाडाला नोटीस देऊन कोसळणार नाही कशावरून?’ अशा शब्दांत न्यायालयाने म्हाडाला सुनावले.मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेच्या बाजूला असलेल्या डोंगरांना पावसाळ्यात नेट लावणाऱ्या कंत्राटदाराचे याकामी साहाय्य घ्या, अशी सूचनाही न्यायालयाने म्हाडाला केली. १५० वर्षे जुनी इमारत ‘धोकादायक’ म्हणून जाहीर करण्यात आल्यानंतर म्हाडाने येथील रहिवाशांना नोटिसा बजावल्या. या नोटिसांना उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. तर म्हाडानेही आयआयटी मुंबईने दिलेल्या अहवालानुसार ही इमारत पाडण्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी मिळविण्यासाठी याचिका केली आहे.‘अघटित घटना घडू नये’‘म्हाडाने आखलेल्या सुरक्षात्मक उपाययोजना पुरेशा नाहीत. आम्ही त्यावर समाधानी नाही. वरपासून खालपर्यंत संपूर्ण इमारत सुरक्षित करा. पावसाळ्यात कोणतीही अघटित घटना घडू नये एवढेच आम्हाला वाटते,’ असेही न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :न्यायालय