Join us

आयुक्तांच्या मालमत्तेचे दस्तावेज केले जप्त

By admin | Updated: May 31, 2015 01:59 IST

केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) देशातील वेगवेगळ्या ठिकाणी नागपूरचे आयकर आयुक्त (३) अमरदीप यांच्या मालकीच्या मालमत्तांच्या घेतलेल्या झडतीत बेनामी मालमत्तेशी संबंधित अनेक कागदपत्रे सापडली आहेत.

डिप्पी वांकाणी ल्ल मुंबई केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) देशातील वेगवेगळ्या ठिकाणी नागपूरचे आयकर आयुक्त (३) अमरदीप यांच्या मालकीच्या मालमत्तांच्या घेतलेल्या झडतीत बेनामी मालमत्तेशी संबंधित अनेक कागदपत्रे सापडली आहेत.सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार सीबीआयने स्वत:हून अमरदीप यांच्याविरुद्ध त्यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता जमविल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. अमरदीप यांच्या नागपूरमधील निवासस्थानाचे दार कोणीही न उघडल्यामुळे सीबीआयने निवासस्थान सील केले आहे. अमरदीप सध्या प्रशिक्षणासाठी लंडनला आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी झडती घेतली, असे सीबीआयच्या प्रवक्त्या कांचन प्रसाद यांनी दिल्लीहून सांगितले. प्रसाद म्हणाल्या की, अमरदीप यांच्या ज्ञात मालमत्तेशी संबंधित दस्तावेज आम्ही वेगवेगळ्या ठिकाणांहून जप्त केले आहेत. त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानीदेखील दस्तावेज व इतर गोष्टी मिळतील म्हणून आम्ही त्यांचे निवासस्थान सील केले आहे. लंडनहून अमरदीप परत आल्यावर त्यांना अटक करणार का, असे विचारता प्रसाद यांनी आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहोत. चौकशीत जर त्यांनी सहकार्य केले नाही तर त्यांना अटक केली जाईल, असे त्यांनी सांगितले.या प्रकरणात कोणीही खासगी तक्रारदार नाही. अमरदीप यांची अंतर्गत चौकशी केल्यानंतर त्यांच्याबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सीबीआयनेच गुन्हा दाखल केला, असे सीबीआयच्या प्रवक्त्या कांचन प्रसाद म्हणाल्या. एका जुन्या अपील प्रकरणात अमरदीप यांनी त्या संबंधित पक्षाला अनुकूल भूमिका घेतल्याचा संशय आल्यानंतर त्यांची मुंबईहून साधारण वर्षभरापूर्वी बदली करण्यात आली होती. वेगवेगळ्या ठिकाणांहून मिळालेला दस्तावेज एकत्र केल्यानंतर अमरदीप यांचे म्हणणे नोंदवून घेतले जाईल, असेही कांचन प्रसाद म्हणाल्या.