Join us

डॉक्टर कागदावरच लिहितात रुग्णांची माहिती; कॉम्प्युटरवर डाटा उपलब्ध नाही

By संतोष आंधळे | Updated: March 12, 2025 09:27 IST

'एचएमआयएस' प्रणाली कार्यान्वयित नसल्याने एकत्रित माहिती मिळण्यात अडचणींचा सामाना

मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस) असणे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने बंधनकारक केले आहे. मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच रुग्णालयात रुग्णांची माहिती हाताने लिहिण्याचे काम जवळपास अडीच वर्षांपासून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून 'लवकरच ही प्रणाली सुरू करण्यात येईल', असे वैद्यकीय शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे. ही प्रणाली नसल्यामुळे रुग्णांचा वर्षभराचा डेटा एकत्रित मिळण्यास डॉक्टरांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

एचएमआयएस बंद असल्याने सर्वच रुग्णालयांत रुग्णांच्या नोंदी, त्यांच्या चाचण्यांचे अहवाल, रुग्णालयातून सोडण्यासंदर्भातील माहिती हाताने लिहावी लागत आहे. त्यामुळे ही प्रणाली लवकर सुरू व्हावी, अशी मागणी होत आहे. ही यंत्रणा चालू व्हावी, यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने सर्व रुग्णालयांना कॉम्प्युटर पुरविले. मात्र, यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी अत्यावश्यक असलेले लोकल एरिया नेटवर्क (लॅन) व इंटरनेट सुरू झालेले नाही. तसेच, ऑपरेटर पुरविले नाही. त्यामुळे कॉम्प्युटर रुग्णालयात धूळ खात आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक वैद्यकीय शिक्षण विभागाने नवीन प्रणाली घेण्याचा निर्णय घेतला.

१२ वर्षे सुरू होती सेवा

 ५ जुलै २०२२ पासून रुग्णालयांतील ही सेवा बंद करण्यात आली. सेवा आणि त्यावरील शुल्क यावरून सेवा देणारी कंपनी आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रकरण न्यायालयात आहे. त्या अगोदर गेली १२ वर्षे हे काम डिजिटल पद्धतीने करण्यात येत होते. मात्र, या प्रकरणाचा निकाल केव्हा लागेल, हे माहीत नसल्याने वैद्यकीय शिक्षण विभागाने नवीन प्रणाली घेण्याचा निर्णय घेतला.

२६९ कोटींच्या खर्चाला मान्यता

वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी देशातील विविध रुग्णालयांत जाऊन तेथील 'एचएमआयएस'ची पाहणी करून आले. त्यानंतर केंद्र सरकारच्या अखत्यारितील नॅशनल इन्फरोमॅटिक्स सेंटरने (एनआयसी) विकसित केलेली 'नेक्स्ट जन ई-हॉस्पिटल' या अद्ययावत प्रणालीची निवड केली.

ही प्रणाली सुरू करण्यासाठी वैद्यकीय विभागाने पाच वर्षांकरिता येणाऱ्या २६९ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. तसेच, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व २५ वैद्यकीय महाविद्यालयांत ती सुरू करण्यात येणार आहे.

महिनाभरात प्रणाली सुरू करणार ही सेवा सुरू व्हावी यासाठीचे ७० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. महिनाभरात ही सुविधा सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. लॅनसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील महिन्यात सर्व रुग्णालयांतील एचएमआयएस प्रणाली सुरू केली जाईल - राजीव निवतकर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण विभाग 

टॅग्स :मुंबईडॉक्टर