Join us
Daily Top 2Weekly Top 5

पळ काढणार्‍या डॉक्टरांचा दंड वाढणार

By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST

पळ काढणार्‍या डॉक्टरांचा दंड वाढणार

पळ काढणार्‍या डॉक्टरांचा दंड वाढणार
१५ लाखांचा दंड ५० लाख करण्याचा विचार
पालिका बुधवारी आणणार प्रस्ताव
मुंबई: पालिकेच्या सेवेत असताना पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी सेवा अर्धवट सोडून पळ काढत आहेत़ अशा डॉक्टरांकडून वसूल करण्यात येणारा १५ लाख रुपये दंड वाढवून ५० लाख अथवा दहा वर्षे पालिकेत सेवा करण्याची सक्ती करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे़ हा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे़
पालिकेचे रुग्णालय, आरोग्य केंद्र व वैद्यकीय संस्थांमध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकारी तसेच इतर खात्यातील अधिकार्‍यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येते़ मात्र हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पाच वर्षे पालिका सेवेत राहण्याची त्यांना सक्ती असते़ ही अट मान्य नसल्यास १५ लाख रुपये दंडही ठोठावण्यात येतो़ परंतु गेल्या काही वर्षांत पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले अधिकारी पळ काढत असल्याचे प्रमाण वाढले आहे़
याची गंभीर दखल घेऊन दंडाची रक्कम वाढविण्याची शिफारस स्थायी समितीने केली होती़ त्यानुसार पालिका प्रशासने ही रक्कम ५० लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे़ पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पाच वर्षांऐवजी दहा वर्षे पालिका सेवेत राहण्याची अटही घालण्यात आली आहे़ ही अट मान्य नसल्यास ५० लाख रुपये दंड या अधिकार्‍यांना भरावा लागणार आहे़ (प्रतिनिधी)