मुंबई : डॉक्टरांच्या सत्याग्रहापुढे केंद्र सरकारने अखेर नमते घेतले आहे. डॉक्टरांच्या प्रमुख सहा मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी डॉक्टरांनी सत्याग्रह करण्याचा इशारा दिला होता. पण, त्याआधीच केंद्र सरकारच्या वैद्यकीय मंत्रालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनशी चर्चा करुन, एका समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे हा सत्याग्रह सध्या स्थगित करण्यात आला आहे. ‘आयएमए’च्या दोन लाख डॉक्टरांनी देशव्यापी सत्याग्रह करणार असल्याचा इशारा १० नोव्हेंबर रोजी दिला होता. पंतप्रधान, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना सत्याग्रह करणार असल्याचे पत्र पाठवले होते. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ दरम्यान रुग्णालय, बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले होते. बी.एस.सी सामाजिक स्वास्थ्य (कम्युनिटी हेल्थ) हा अभ्यासक्रम रद्द करावा, भृणहत्याविरोधी कायद्यात सुधारणा कराव्यात, नव्या येणाऱ्या वैद्यकीय आस्थापन कायद्यात (क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट) काही बदल करावेत, क्रॉसपॅथी करता येऊ नये आणि केंद्र सरकारच्या आरोग्यासाठीच्या अंदाजपत्रकात काही तरतूदींचा समावेश करावा या डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या होत्या. या मागण्यांचा विचार केला जाईल, असे ठोस आश्वासन वैद्यकीय मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. यासाठी डॉक्टर आणि सरकारच्या अधिकाऱ्यांची मिळून एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत आयएमएचे ३ पदाधिकारी असणार आहेत. डॉक्टरांच्या प्रमुख पाच मागण्यांवर सहा आठवड्यांत समितीद्वारे तोडगा काढला जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. या सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. त्यामुळे ‘आयएमए’ने सत्याग्रह तात्पुरता मागे घेतला आहे. (प्रतिनिधी)
डॉक्टरांचा संप मागे
By admin | Updated: November 12, 2015 03:02 IST