Join us

डॉक्टर, तुम्हीही काळजी घ्या ! ताणविरहित राहण्यासाठी समुपदेशन, औषधोपचाराचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:10 IST

मुंबई : मुंबई महापालिका रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकाही याचा सामना करीत असून, आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या डॉक्टर-परिचारिकांचा मानसिक ताणतणाव ...

मुंबई : मुंबई महापालिका रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकाही याचा सामना करीत असून, आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या डॉक्टर-परिचारिकांचा मानसिक ताणतणाव वाढतो आहे. या सगळ्यांना मानसिक ताणातून बाहेर काढण्याबरोबरच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या लढाईत डॉक्टर व परिचारिकांवर कामाचा अतिरिक्त ताण होता. शिवाय लागण होण्याची भीती वाटत राहणे स्वाभाविक आहे. एकीकडे या सर्वांच्या घरची मंडळीही निश्चितच तणावाखाली असणार, तर घरच्यांच्या चिंतेमुळे रुग्ण व्यवस्था सांभाळणारी यंत्रणाही अस्वस्थ होणार. यासाठी कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांच्या मानसिक स्वास्थ्याची आरोग्य विभागाकडून काळजी घेतली जात आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.

कोरोनाशी लढणाऱ्या प्रत्येकाला कोरोना संरक्षित पोशाख, मास्क व आवश्यक वैद्यकीय सुविधेबरोबरच पुरेशी विश्रांती मिळाली पाहिजे. त्यांना घरी जाण्यासाठी योग्य व्यवस्था करून दिली पाहिजे तसेच विश्रांतीच्या काळात त्यांना तणावातून बाहेर पडण्यासाठी मनोरंजनाचीही व्यवस्था केली पाहिजे. तसंच त्यांचे मानसिक स्वास्थ्य भक्कम राहण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजे, असे पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. डॉक्टरही माणूसच आहे. स्वत:चा विचार न करता ते प्रथम रुग्णसेवेला महत्त्व देतात. त्यानंतरही डॉक्टरांना कामाच्या ठिकाणी मारहाणीच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. कामाचा अतिताण, त्यात रुग्णांच्या नातेवाइकांकडून होणाऱ्या मारहाणीची भीती, अशा वातावरण डॉक्टर सेवा पुरवत असतात, त्यांनाही विश्रांतीची गरज आहे, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. डेव्हिड अल्मेडा यांनी सांगितले.

समुपदेशन गरजेचे

ज्या समस्यांचा त्याच्या जीवनावर परिणाम होत आहे आणि ज्याला यातून सुयोग्य मार्ग काढून आनंदी व सुदृढ व्हायचे आहे, त्याच्यासाठी समुपदेशन गरजेचे आहे. समुपदेशन त्या प्रत्येकासाठी - ज्याला मानसिक आरोग्याच्या संपन्नतेची गरज भासते, व्यक्तिमत्त्व विकासाची इच्छा असते व जो कौटुंबिक, सामाजिक घटकांच्या सौख्याची आकांक्षा बाळगतो. असे असूनही बऱ्याचजणांच्या मनात मानसशास्त्र व मानसशास्त्रीय समुपदेशनाविषयी संदेह असलेला आढळतो. या संदेहाची कारणे म्हणजे या प्रक्रियेबद्दलचे काही ठाम विचार व मते. यामुळे समुपदेशन अवलंबिण्यावर होणारा विपरीत परिणाम अधिक तीव्र होताना दिसतो.