Join us
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर स्वसंरक्षणार्थ सज्ज; मदतीसाठी व्हॉटस अ‍ॅपद्वारे ग्रुपची स्थापना

By admin | Updated: September 23, 2015 02:32 IST

डॉक्टरांची चूक नसतानाही रुग्णाचा मृत्यू झाल्यावर नातेवाइकांकडून होणारी मारहाण, नातेवाइकांकडून रुग्णालय, क्लिनिकचे होणारे नुकसान अशा घटना वारंवार घडत आहेत.

मुंबई : डॉक्टरांची चूक नसतानाही रुग्णाचा मृत्यू झाल्यावर नातेवाइकांकडून होणारी मारहाण, नातेवाइकांकडून रुग्णालय, क्लिनिकचे होणारे नुकसान अशा घटना वारंवार घडत आहेत. यामुळे रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. म्हणूनच स्वसंरक्षणार्थ डॉक्टरांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि एका खासगी कंपनीचा आधार घेतला आहे. मारहाणीसारखी परिस्थिती उद्भवल्यास डॉक्टरच डॉक्टरांच्या मदतीला धावून येऊ शकतात. यामुळे एका परिसरातील जवळपास असणाऱ्या २० ते २५ डॉक्टरांचा व्हॉट्सअ‍ॅपवर ‘झोनल डिस्टन्स गु्रप’ तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. जयेश लेले यांनी दिली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली परिसरातील ४ हजार डॉक्टरांनी एका खासगी कंपनीत नावनोंदणी केली आहे. या कंपनीने त्यांना एक क्रमांक दिला आहे. डॉक्टरांना एखाद वेळेस परिस्थिती हाताबाहेर चालली आहे, असे वाटल्यास त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधायचा. डॉक्टरांनी आम्ही धोक्यात आहोत, असे सांगितल्यावर पुढच्या ५ ते ७ मिनिटांत त्या ठिकाणी कंपनीची काही माणसे पोहोचतील. ही माणसे कोणलाही मारहाण करणार नाहीत, पण परिस्थिती नियंत्रणात आणतील. पोलीस येईपर्यंत कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून या व्यक्ती कार्यरत असतील, असे असोसिएशन मेडिकल कन्सल्टंट विश्वस्त डॉ. सुहास काटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)