Join us  

काेराेना काळात डॉक्टर पतीचे संसाराकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 5:31 AM

पत्नीची तक्रार : कामाचा ताण वाढला, उच्च न्यायालयाकडून पतीला दिलासा

मुंबई : कोरोनाच्या सुरुवातीलाच कामाचा प्रचंड ताण आल्याने त्याचा विपरीत परिणाम वैवाहिक जीवनावर झाल्याची तक्रार करणाऱ्या पत्नीने तिच्या डॉक्टर पतीविरुद्ध नोंदविलेला गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला.

गुन्हा रद्द करताना न्या. एस. एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने म्हटले की, संबंधित दाम्पत्याने त्यांच्यातील वाद सोडवून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, गुन्हा रद्द करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी खंडपीठाने दाम्पत्याशी बोलण्याचा निर्णय घेतला. मात्र, पती कामात व्यस्त असल्याने केवळ मायक्रोबायोलॉजिस्ट असलेली पत्नीच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर राहिली. तिचा पती सरकारी रुग्णालयात काम करतो.तिने न्यायालयाला सांगितले की, मार्च, एप्रिलमध्ये रुग्णालयात कोरोनासंदर्भातील काम वाढल्यानंतर कामाचा खूप ताण आला. दरदिवशी आम्ही १८ तास काम करत होतो आणि त्यामुळे आमच्यात गैरसमजुती वाढत गेल्या. परिणामी मी पतीविरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा नोंदविला. विवाहाला २० वर्षे झाली असून दोन मुले असल्याचेही तिने न्यायालयाला सांगितले. आपला एक मित्रही डॉक्टर असून सरकारी रुग्णालयात काम करत असल्याचे न्या. शिंदे यांनी म्हटले. कोरोनाच्या काळात प्रत्येकावर कामाचा खूप ताण आहे. या काळात डॉक्टरांनी जे काम केले त्याबद्दल आम्हाला त्यांचा आदर आहे, असे न्या. शिंदे यांनी म्हटले.

भविष्यासाठी शुभेच्छा देऊन याचिका काढली निकालीन्यायालयाने तिला विचारले की, हा गुन्हा ती स्वतःच्या मर्जीने मागे घेत आहे का? त्यास तिने होकारार्थी उत्तर दिले. सप्टेंबरमध्येच मुलांसह पतीच्या घरी राहायला आल्याची माहिती तिने न्यायालयाला दिली. या दाम्पत्याला त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई