Join us

डॉक्टर तरुणीला ११ लाखांचा गंडा

By admin | Updated: June 22, 2017 04:44 IST

दादरमधील एका डॉक्टर तरुणीला फेसबुक मैत्री भलतीच महागात पडली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दादरमधील एका डॉक्टर तरुणीला फेसबुक मैत्री भलतीच महागात पडली आहे. परदेशातील फेसबुक मित्राने पाठविलेले गिफ्ट कस्टम अधिकाऱ्याने पकडल्याच्या नावाखाली, तिच्याकडून तब्बल ११ लाख रुपये उकळले. या प्रकरणी भोईवाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.भोईवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी दादरमध्ये राहते. ती एका नामांकित रुग्णालयात काम करते. फेसबुकवरून तिची इटलीच्या स्पायरो जॉन (३५) सोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर, दोघांमधील संवाद वाढला. याच दरम्यान जॉनने तरुणीची माहिती मिळवली. तरुणीचा विश्वास संपादन केला. काही दिवसांपूर्वी जॉनने तिला एक गिफ्ट पाठविल्याची माहिती दिली. त्याच्या कॉलनंतर तिला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. संबंधित व्यक्तीने कस्टम अधिकारी असल्याचे सांगितले. जॉनने पाठविलेले गिफ्ट महागडे असून, त्यासाठी कस्टम ड्युटी भरण्यास सांगितले. तरुणीनेही संबंधिताच्या खात्यावर ४७ हजार पाठविले. त्यानंतर, काही दिवसांनंतर संबंधित क्रमांकावरून तिला पुन्हा फोन आला. त्याने गिफ्टसोबत आलेल्या रकमेमुळे जॉनला अटक होऊ शकते. त्यासाठी आणखीन पैसे द्यावे लागतील, अशी भीती घातली. त्यामुळे तरुणीने त्याला तब्बल ११ लाख रुपये दिले. मात्र, तरीदेखील संबंधिताकडून पैशांची मागणी होत होती. अखेर संबंधिताच्या वाढत्या मागण्यामुळे तिने याबाबत अधिक चौकशी केली, तेव्हा असे कुठले गिफ्टच आले नसल्याची माहिती मिळाली. यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे समजताच, तरुणीने भोईवाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. फेसबुकवरील अकाउंटचीही माहिती घेण्यात आली. त्यामध्ये ते अकाउंटही फेक असल्याचे उघड झाले. संबंधित बँक खात्यांच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.