Join us
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी दवाखान्यात उसना डॉक्टर

By admin | Updated: July 7, 2015 00:46 IST

गोरगरिबांना खाजगी महाग रुग्णालय परवडत नसल्याने लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकारी दवाखान्यांची सोय करण्यात आली

टोकावडे : गोरगरिबांना खाजगी महाग रुग्णालय परवडत नसल्याने लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकारी दवाखान्यांची सोय करण्यात आली. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे सरकारी रुग्णालयांना डॉक्टरच मिळत नसल्याने इकडून-तिकडून उसने डॉक्टर आणून शिरोशी येथील जिल्हा परिषदेचा दवाखाना चालविण्याची वेळ तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर आली आहे.मुरबाड तालुक्यातील गोरगरीब, आदिवासी वनवासी विभागातील शिरोशी हे तीस ते चाळीस गावांचा परिसर असलेला विभाग असून येथील नागरीकांच्या दवापाण्यासाठी शिरोशी येथे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्यकेंद्र असून या परिसरातील नागरिकांना हा दवाखाना सोईस्कर आहे. या ठिकाणी सर्पदंश, विंचूदंश रुग्णांवर उपचार केले जातात. प्रसुतीसाठीदेखील हेच रुग्णालय सोयीचे आहे. थंडीतापावर देखील उपचार केले जातात. वर्षभरापासून या ठिकाणी कायमस्वरुपी डॉक्टर नसल्याने रुग्णांना खाजगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे. तर तात्पुरती सोय म्हणून माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेले सावर्णे येथील प्राथमिक आरोग्य पथक बंद करून तेथील डॉ. महीरराव यांची तसेच न्याहाडी येथील डॉक्टर खर्डे यांची तीन-तीन दिवसांसाठी शिरोशी प्रा. आरोग्यकेंद्रात नियुक्ती करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे डॉ. खर्डे यांची मोरोशी येथे बदली झाली असून न्याहाडी येथील उपकेंद्रे देखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या विभागातील मेर्दी, बंदिशेत, वाल्हीवरे, कोंबडपाडा, केळवाडी, खुटल, न्याहाडी, आल्याची राडी, धाराखेंड या दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात तर हा प्रश्न फार गंभीर होणार आहे. (वार्ताहर)