Join us
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणे मूळव्याधावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डाॅक्टरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:06 IST

टॅक्सीचालकाच्या तक्रारीनंतर माटुंगा पाेलिसांनी घेतले ताब्यातलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एमबीबीएस डाॅक्टरला मूळव्याधावर शस्त्रक्रिया करण्याची कायदेशीर परवानगी नसतानाही ...

टॅक्सीचालकाच्या तक्रारीनंतर माटुंगा पाेलिसांनी घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एमबीबीएस डाॅक्टरला मूळव्याधावर शस्त्रक्रिया करण्याची कायदेशीर परवानगी नसतानाही एक डाॅक्टर गेल्या ६ ते ७ वर्षांपासून मूळव्याधावर शस्त्रक्रिया करत हाेता. त्याच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे गोरेगावमधील टॅक्सीचालकाला नाहक त्रास झाला. त्याच्या तक्रारीवरून या प्रकरणी गोपाळराव क्लिनिकच्या डॉक्टर एस. मुकेश कोटाला माटुंगा पोलिसांनी अटक केली.

गोरेगाव परिसरात राहणारे ४३ वर्षीय तक्रारदार टॅक्सीचालक कुटुंबासाेबत राहतात. त्यांना गेल्या ३ वर्षांपासून मूळव्याधीचा त्रास होता. त्यांच्या सहकारी टॅक्सीचालकांनी दादर टी. टी. सर्कल येथेे असलेल्या गोपाळराव क्लिनिकबाबत त्यांना सांगितले. त्यांच्या मुलीने इंटरनेटवरून माहिती घेतली. दरम्यान, मुंबईतल्या विविध रस्त्यांवर त्याचे बॅनर दिसल्यामुळे विश्वास बसला. त्यांनी फेब्रुवारीत तेथील डॉ. एस. मुकेश कोटा यांची भेट घेत उपचार सुरू केले. २१ फेब्रुवारीला कोटाने शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार २५ हजार रुपये घेऊन त्यांची शस्त्रक्रिया केली.

शस्त्रक्रियेनंतर चार तासांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले. ते पत्नीसोबत टॅक्सीने घरी जात असतानाच त्यांना रक्तस्राव होऊ लागला. चक्कर येऊन कोसळल्याने त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपराचादरम्यान डाॅ. कोटाने चुकीच्या पद्धतीने निष्काळजीपणाने उपचार केल्याचे समाेर आले. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर २५ मार्च रोजी त्यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या शस्त्रक्रियेमुळे त्यांच्यावर डायपर घालण्याची वेळ ओढावली. शिवाय कुठलेही वाहन चालविणे शक्य नसल्यामुळे उदरनिर्वाहाचा मार्ग बंद झाला. डॉ. कोटाविरुद्ध तक्रार येताच माटुंगा पोलिसांनी तत्काळ याबाबत महाराष्ट्र वैद्यकीय परिषद तसेच जे. जे. रुग्णालय यांच्याकडे विचारणा केली. यासाठी जे.जे. रुग्णालयात तज्ज्ञ समिती २१ जून राेजी गठित करण्यात आली होती.

माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बोबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समितीचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. यात एमबीबीएस डॉक्टर मूळव्याधावर शस्त्रक्रिया करू शकत नाहीत. मूळव्याधावर शस्त्रक्रिया करण्याकरिता वैद्यकीय व्यावसायिकाला एम.एस. सर्जरी ही अतिरिक्त शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे. तसेच उपचार करताना कोटा यांनी निष्काळजीपणा, हलगर्जीपणा केल्याचे नमूद करण्यात आले. त्यानुसार कोटा याला अटक करण्यात आली.

* आधीच्या शस्त्रक्रियांंचे क़ाय?

कोटा गेल्या ६ ते ७ वर्षांपासून अशा प्रकारे मूळव्याधावर शस्त्रक्रिया करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अन्य रुग्णांचे काय झाले, याबाबतही पोलीस अधिक तपास करत आहेत.

........................................................