Join us

बघतोस काय? गाडी नीट चालव! गोरेगाव येथील सिग्नल साइन बोर्ड हॅक 

By गौरी टेंबकर | Updated: December 24, 2022 08:36 IST

अश्लील भाषेत संदेश डिस्प्ले

मुंबई : डिजिटल साइन बोर्ड हॅक करून त्यावर अश्लील संदेश झळकावण्याचा पवई आणि हाजी अली येथील प्रकार ताजा असतानाच आता गोरेगाव येथील ओबेरॉय मॉल सिग्नल येथेही तसाच प्रकार घडल्याचे शुक्रवारी निदर्शनास आले. 

गोरेगाव पूर्वेकडील वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ डिजिटल साइन बोर्ड आहे. या बोर्डवर शुक्रवारी दुपारी ‘बघतोस काय ***, गाडी नीट चालव’, असा संदेश दिसत होता. विशेष म्हणजे साइन बोर्डच्या खालच्या पट्टीवर ‘प्लीज ड्राइव्ह सेफली’ असा मेसेज दिसत होता. मात्र, वरच्या पट्टीवर वरीलप्रमाणे अश्लील संदेश झळकत होता.

त्यामुळे वाहनचालकांचा गोंधळले.  डिजिटल साइन बोर्डवर अश्लील संदेश प्रसारित केला जात असल्याची बाब दिंडोशी पोलिसांच्या लक्षात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जीवन खरात यांनी या प्रकाराची दखल घेत त्यांच्या पथकाला चौकशीचे निर्देश दिले.  

हाजी अलीतही घडला प्रकारदोन दिवसांपूर्वी हाजी अली दर्गा येथील सिग्नलवर दररोज गांजा प्या  (स्मोक वीड एव्हरी डे) असा मेसेज हॅकरकडून पाठविण्यात येत होता. तर  नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पवई प्लाझा मॉलच्या बाहेर लावलेल्या होलिस्टिक ॲक्युपंक्चर सेंटरच्या डिजिटल जाहिरात फलकाच्या बाबतीतही असाच प्रकार घडला. दुकानाच्या डिजिटल बोर्डवर मराठीत ‘बघतोय काय…*****…’ असा फ्लॅश येत होता. २० हजार हून अधिक लोकांनी हा बोर्ड सोशल मीडियावर पाहिला. 

ओबेरॉय मॉल सिग्नलजवळील हा डिजिटल साइन बोर्ड महापालिकेने बंद केला असून त्याबाबत आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही.जीवन खरात वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दिंडोशी

टॅग्स :मुंबई