Join us  

तुम्हाला झोपेत स्वप्न पडतं का?; चिमुकलीच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचा मौल्यवान सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 5:52 PM

बालदिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमुकल्यांसोबत दिलखुलास गप्पा मारल्या.

मुंबई - बालदिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालमोहन विद्या मंदिरात जात विद्यार्थ्यांनी संवाद साधला. चिमुकल्यांच्या प्रश्नावर फडणवीस यांनीही दिलखुलास उत्तरे दिली. इतक्या वर्षांनी शाळेच्या वर्गात येऊन आनंद वाटला. शाळेत असताना उंची जास्त असल्याने मागच्या बेंचवर बसायचो पण पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या बाकावरून समोरच्या बाकावर आलोय अशी आठवण फडणवीसांनी सांगितली. 

एबीपी माझानं आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी चिमुकल्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिले. त्यात अनिष्का दामले या चिमुकलीनं तुम्ही झोपल्यावर तुम्हाला स्वप्न पडतं का? आणि ते पूर्ण होतं का? असा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांना केला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नक्कीच मला झोपल्यावर स्वप्न पडतं. पण झोपेतल्या स्वप्नापेक्षा आपण जागेपणी जे पाहतो, विचार करतो आणि ते पूर्ण करण्यासाठी अविश्रांत मेहनत घेतो त्यावेळीच आपले स्वप्न पूर्ण होते. नुसते झोपेतलं स्वप्न पाहायचं आणि विसरून जायचं यातून कधीच आपण पुढे जाऊ शकत नाही असं त्यांनी सांगितले. त्यामुळे आपण आपल्या स्वप्नाच्या मागे आपली क्षमता, आपली ताकद आणि श्रम हे लावलं तर नक्कीच आपली स्वप्नं पूर्ण होतात असा मौल्यवान सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. 

तुम्हाला राग आल्यावर काय करता?तर एका चिमुकलीनं तुम्हाला राग आल्यावर काय करता असा प्रश्न फडणवीसांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, मला खरेच राग येत नाही. फार कमी राग येतो. मला राग आला तर त्याचा अर्थ समजायचं मला भूक लागली आहे. कुणी पटकन खायला दिलं तर माझा राग संपतो असं सांगितलं तेव्हा चिमुकल्यांमध्ये जोरदार हशा पिकला. 

बेस्ट फ्रेंड कोण?ईरा पाटणकर हिने विचारलं, तुमचा लहानपणीचा बेस्ट फ्रेंड कोण होता? त्यावर माझ्यासोबत लहानपणी शाळेत असताना माझ्या बेंचवर शेजारी बसणारा माझा बेस्ट फ्रेंड होता. त्याचे नाव अल्हाद राजे असं आहे. तो आर्टिटेक्ट आहे. मुंबईत तो प्रॅक्टिस करतो. आम्ही दोघंही पहिल्या वर्गापासून दहावीपर्यंत सोबत एकत्र शेवटच्या बेंचवर बसलो. कुणालाही मध्ये बसू दिले नाही. एकदा आमच्या टीचरने आमच्या दोघांच्या मध्ये वर्गातील मुलीला बसवलं. तेव्हा अल्हादने असं वातावरण तयार केले ज्यामुळे त्या मुलीला तिथून उठावं लागलं त्यानंतर आम्ही दोघे एकत्र बसलो. बाकी माझ्या कॉलनीत अनेक बेस्ट फ्रेंड होते त्यांच्यासोबत मी खूप खेळायचो.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसबालदिन