मुंबई : ज्या कट्ट्यावर कलेच्या गप्पांचा फड रंगला, ज्या कट्ट्याने छोट्या आणि मोठ्या कलाकारांमध्ये कधीच भेद नाही केला, ज्या कट्ट्याने कलासंस्कृतीमध्ये कायमच भर घातली आणि ज्या कट्ट्याने कलाकरांसह कलारसिकांचे ‘पोट’ही भरले, असे कॅफे समोवर सुरूच ठेवण्यासाठी उभी झालेली चळवळ आता आणखी व्यापक बनली आहे.उषा खन्ना या महिलेने १९६४ साली फोर्ट येथील जहांगिर आर्ट गॅलरीच्या आडोशाला कॅफे समोवर हे रेस्टॉरंट सुरू केले. १९६०-७० च्या दशकात येथे नामवंत चित्रकार, लेखक आणि आर्ट सिनेमावाल्यांचे गप्पांचे फड रंगत होते. जेव्हा जहांगिर आर्ट गॅलरी सुरू झाली, तेव्हा साहजिकच येथे वावरणाऱ्या कलाकरांसह कलारसिकांना बैठकीच्या अड्ड्याची गरज होती. आणि कॅफे समोवरने ती भागविलीदेखील. मात्र आता हे रेस्टॉरंट इतिहासजमा होणार म्हटल्यावर सर्वांनीच याविरोधात आवाज उठविला. महत्त्वाचे म्हणजे आर्ट गॅलरीच्या विस्तारात अडथळा ठरत असलेल्या कॅफे समोवरबाबतची न्यायालयीन लढाईदेखील हरल्यानंतर अजूनही उषा खन्ना यांच्या कन्या देविका भोजवानी यांच्या आशा प्रफुल्लित आहेत.म्हणूनच कॅफे समोवर बंद होऊ नये, याकरिता देविका भोजवानी यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या शायना एन.सी. यांची भेट घेऊन म्हणणे मांडले. यावर शायना एन.सी. यांनी सोमवारी या प्रकरणी थेट देविका भोजवानी आणि मालविका संघवी यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कॅफे समोवर सुरू राहावे, यासाठी पर्यटन विभागाला प्रस्ताव सादर करण्याची विनंती केली. तसेच जिव्हाळ्याचे कॅफे समोवर हे रेस्टॉरंट जहांगिर आर्ट गॅलरीलगतच सुरू ठेवण्याबाबत सहकार्याची विनंती केली. (प्रतिनिधी)
‘कॅफे समोवर’ बंद करू नका!
By admin | Updated: March 31, 2015 01:46 IST