Join us
Daily Top 2Weekly Top 5

खेळपट्ट्या खराब करू नका

By admin | Updated: August 28, 2014 01:19 IST

क्रिकेट पीच खराब होणार नाही याची काळजी घ्या, असा दम देत उच्च न्यायालयाने यंदाही गणपती विसर्जनाला शिवाजी पार्क मैदानावर वाहने पार्किंग करण्यास राज्य शासनाला परवानगी दिली़

मुंबई : क्रिकेट पीच खराब होणार नाही याची काळजी घ्या, असा दम देत उच्च न्यायालयाने यंदाही गणपती विसर्जनाला शिवाजी पार्क मैदानावर वाहने पार्किंग करण्यास राज्य शासनाला परवानगी दिली़ त्यामुळे २, ४ व ८ सप्टेंबरला गणेशभक्तांना या मैदानात वाहने पार्किंग करता येतील़ हे मैदान शांतता क्षेत्र घोषित झाल्याने येथे सभा आयोजित करायची असल्यास अथवा पार्किंग करायची असल्यास न्यायालयाची परवानगी बंधनकारक आहे़ त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी गणेशभक्तांना येथे वाहने पार्किंग करता यावी यासाठी गेली तीन वर्षे शासन न्यायालयाचे दार ठोठावत होते़ त्याची दखल घेत न्यायालयाने यासाठी पर्यायी जागा शोधण्याचे आदेश गेल्या वर्षी शासन व महापालिकेला दिले होते़ त्यानुसार बापट मार्गाचा पर्याय पुढे आला़ तो शासनाने नाकारला व यंदाच्या विसर्जनाला शिवाजी पार्क मैदानात पार्किंग करता यावी यासाठी न्यायालयात धाव घेतली़मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्या़ एम़ एस़ सोनक यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सुनावणी झाली़ त्यात न्यायालयाने गेली दोन वर्षे यासाठी परवानगी दिली जात असल्याने यंदाही ही परवानगी दिली जात असल्याचे स्पष्ट केले़ मात्र क्रिकेट पीच खराब होणार नाही याची काळजी घ्यावी व विसर्जनानंतर पालिकेने मैदान पूर्ववत करावे या अटीही न्यायालयाने घातल्या आहेत़ (प्रतिनिधी)