मुंबई : राज्यात बास्केटबॉलचे वातावरण नाही, पण आपल्याकडे सर्वोत्तम खेळाडूंचा भरणा आहे. केवळ खेळाचे राजकारण झाल्याने त्याचा फटका खेळाडूंना बसतो, अशी खंत भारताचा माजी बास्केटबॉल कर्णधार संभाजी कदम याने व्यक्त केली. गोवंडी येथील देवनार कॉलनी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक १ मध्ये ‘टीच फॉर इंडिया’ आयोजित बास्केटबॉल कार्यशाळेत कदम बोलत होता. राज्यातील बास्केटबॉल खेळाच्या परिस्थितीबाबत कदम म्हणाला, ‘सर्वांनी एकत्र येऊन खेळाचा सर्वांगीण विकास कसा होईल, याबाबत प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्यातील सोईसुविधा खेळाडूंच्या तुलनेत अपुऱ्या आहेत आणि त्यासाठी सरकारने व संबंधित यंत्रणेने लक्ष घालणे गरजेचे आहे.’ या कार्यशाळेत २० मुले व १८ मुलींनी हजेरी लावली. बास्केटबॉल म्हणजे काय? या खेळातील करिअरसंबंधी कदम याने विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर, त्यांना बास्केटबॉलच्या टिप्स दिल्या.कदम याने पुढे सांगितले की, ‘बास्केटबॉल हा जगातील जलद खेळ म्हणून दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा खेळ शारीरिक, बौद्धिक आणि करिअरसाठी सर्वोत्तम आहे. विदेशात शालेय स्तरावर बास्केटबॉलचे प्रशिक्षण देण्यात येते आणि आपल्याकडेही अशा कार्यशाळेचे आयोजन होणे कौतुकास्पद आहे.’ त्याचप्रमाणे, ‘वडिलांनी कुस्तीमध्ये यश मिळवल्यानंतर त्यांची इच्छा होती की, मीही पैलवान व्हावे, पण मला बास्केटबॉलमध्ये आवड असल्यामुळे १२व्या वर्षी बास्केटबॉलकडे वळलो. खेळाची परिस्थिती तेव्हाही वाईट होती. मात्र, मेहनतीची तयारी असल्याने मी हा खेळ जोपासू शकलो,’ असेही कदम म्हणाला. (प्रतिनिधी)
खेळाचे राजकारण करू नका - कदम
By admin | Updated: April 7, 2016 01:34 IST