Join us

बेकायदा बांधकामांना वीज, पाणीपुरवठा देऊ नका

By admin | Updated: July 27, 2015 23:43 IST

सिडकोची अतिक्रमणांच्या विरोधातील मोहीम थंडावताच बेकायदा बांधकामांचा पुन्हा धडाका सुरू केला आहे. शहराच्या अनेक भागात आजही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे सुरू आहेत.

नवी मुंबई : सिडकोची अतिक्रमणांच्या विरोधातील मोहीम थंडावताच बेकायदा बांधकामांचा पुन्हा धडाका सुरू केला आहे. शहराच्या अनेक भागात आजही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे सुरू आहेत. या अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी सिडकोने आता विविध शासकीय संस्थांना आवाहन केले आहे. सिडकोची परवानगी नसलेल्या इमारतींना पाणीपुरवठा, वीज जोडण्या व इतर सुविधा देवू नयेत, असे आवाहन सिडकोच्या वतीने संबंधित संस्थांना करण्यात आले आहे.नवी मुंबईत अतिक्रमणांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोने दोन महिन्यांपूर्वी जानेवारी २0१३ नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र प्रकल्पग्रस्तांनी या कारवाईला तीव्र विरोध दर्शविला होता. प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांवर पुनर्विचार करण्याच्या दृष्टीने जूनच्या मध्यापासून सिडकोने आपली कारवाई काही प्रमाणात शिथिल केली होती. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात अनधिकृत बांधकामांची सुधारित यादी तयार करून त्यांना सिडकोने नव्याने नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांना प्रतिसाद न देणाऱ्या बांधकामांवर धडक कारवाई करण्याची सिडकोची योजना आहे. असे असले तरी आज शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू असल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे. पूर्वी अर्धवट अवस्थेत असलेल्या इमारतींचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. कोपरखैरणे सेक्टर ६ येथील महापालिका विभाग कार्यालयाच्या मागील बाजूस एका बहुमजली इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. सध्या इमारतीच्या आतील कामांना गती देण्यात आली आहे. सानपाडा सेक्टर ५ येथील गजानन चौकात मागील काही दिवसांपासून एका इमारतीचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे दिघा परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. यासंदर्भात महापालिका, महावितरण, पोलीस तसेच वनविभागाला पत्र देण्यात आल्याचे सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे मुख्य नियंत्रक योगेश म्हसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)बांधकामांना हरकतेबेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी सिडकोने आता थेट विविध शासकीय संस्थांना आवाहन केले आहे. अशा बांधकामांना पाणी, वीज जोडण्या तसेच भोगवटा प्रमाणपत्र देताना संबंधित संस्थांनी त्या बांधकामाला सिडकोची ना हरकत आहे का, याची खातरजमा करावी, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे.