मुंबई : गैरआदिवासी समाजाला आदिवासी आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, अशा शब्दांत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नवनियुक्त सरचिटणीस आणि खासदार सीताराम येचुरी यांनी धनगर आरक्षणाला विरोध दर्शविला. मंगळवारी आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. त्यात येचुरी सहभागी झाले होते. येचुरी म्हणाले की, आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांच्या आरक्षणात गैरआदिवासी समाजाला घुसखोरी करू देणार नाही. धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास पक्षाचा विरोध नाही. मात्र इतक्या वर्षांनी अचानक धनगर समाज आदिवासी असल्याचा शोध कसा लागला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. परिणामी दोन समाजांचा वाद निर्माण करून राजकारण करण्यापेक्षा दोन्ही समाजांच्या आर्थिक विकासासाठी सरकारने प्रयत्न करावा, असा सल्ला त्यांनी दिलादरम्यान, आदिवासींसाठी योजना राबवण्याची मागणी येचुरी यांनी केली. वन अधिकारानुसार कसणाऱ्या वनजमिनी आदिवासींच्या नावे करण्याचे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे. त्रिपुरा राज्यात लाखो एकर जमीन सरकारने आदिवासींच्या नावे केली आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांचा आदर्श घेऊन येथील आदिवासींना न्याय द्यावा, असेही ते म्हणाले.निदान पंतप्रधानांना तरी परत आणा !एनडीए सरकारला सत्तेवर येऊन एक वर्ष झाल्यानंतरही परदेशातील काळा पैसा देशात आणता आला नाही. परिणामी एका वर्षात १८ देशांचा दौरा करणाऱ्या पंतप्रधानांना तरी सरकार देशात परत आणणार का, असा मिश्कील सवाल येचुरी यांनी व्यक्त केला.जुने दिवस परत आणा : ‘अच्छे दिन’चे वचन देणाऱ्या सरकारने जुनेच दिवस पुन्हा आणावे, असे आवाहन येचुरी यांनी केले. गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, दरवाढ या समस्यांमुळे देशातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे खोटी स्वप्ने दाखवणाऱ्या सरकारने जुनेच दिवस परत आणावे, अशा शब्दांत येचुरी यांनी सरकारचा समाचार घेतला.पोलीस आयुक्तांचा निषेध : माकपाचे केंद्रीय कमिटीचे सदस्य नरसय्या आडम यांनी मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचा निषेध व्यक्त केला. मोर्चा काढण्यासाठी परवानगी देण्याचे कबूल करून ऐनवेळी आयुक्तांनी परवानगी नाकारल्याचा आरोप मास्तर यांनी केला.