Join us  

‘मातोश्री’वर विश्वास नाही; बेस्टचा संप सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 5:44 AM

राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने बेस्ट कामगारांच्या मागण्यांबाबत उच्च न्यायालयात अहवाल सादर केल्यानंतर बेस्टचा संप मिटेल असे वाटत असताना नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मुंबई : राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने बेस्ट कामगारांच्या मागण्यांबाबत उच्च न्यायालयात अहवाल सादर केल्यानंतर बेस्टचासंप मिटेल असे वाटत असताना नव्या वादाला तोंड फुटले आहे. बेस्ट कामगारांना एक पैही द्यायचा नसल्याने तुम्ही कामगारांमध्ये पडू नका, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचा खळबळजनक आरोप कामगार नेते शशांक राव यांनी केला. त्यामुळे आता लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही, अशी घोषणाच त्यांनी मंगळवारी रात्री कामगार मेळाव्यात केली. यामुळे बुधवारी नवव्या दिवशीही बेस्ट कामगारांचा संप सुरूच राहणार आहे. सकाळी होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, यावर या संपाचे भवितव्य अवलंबून राहील.

बेस्ट कामगार संघटनांच्या मागण्यांवर राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीबरोबर शनिवारपासून चर्चा सुरू आहे. या समितीने आपला अहवाल मुंबई उच्च न्यायालयापुढे मंगळवारी सादर केला. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार बेस्ट कर्मचाºयांना १० टप्प्यांत वेतनवाढ देण्यास बेस्ट प्रशासनाने अनुकूलता दर्शवली आहे. मात्र, ही पगारवाढ पूर्वलक्षी प्रभावाने लागू न करता फेब्रुवारी २०१९ पासून लागू करण्यात येईल. तत्पूर्वी बेस्ट कर्मचाºयांनी संप मागे घ्यावा, अशी अट बेस्ट प्रशासनाने घातली आहे. मात्र, याबाबत बेस्ट वर्कर्स युनियनने न्यायालयात कोणतेही आश्वासन दिलेले नाही. न्यायालयानेच बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत युनियनला संप मागे घेण्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

या संपाबाबत निर्णय घेण्यासाठी कामगार संघटनांनी वडाळा बस आगारात कामगारांची बैठक बोलावली होती. यामध्ये न्यायालयातील सुनावणी, समितीचा अहवाल याबाबत कामगारांना माहिती देण्यात आली. उच्चस्तरीय समितीच्या अहवालात बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण या मागणीवर एकही शब्द नाही, असे राव यांनी सांगितले. तसेच आणखी काही मागण्यांबाबत बेस्ट, महापालिका यांची भूमिका सुस्पष्ट नाही. काहीही लिखित देण्यास तयारी दर्शविलेली नाही. त्यामुळे संप मागे घेतल्यास पुढे काहीही होणार नाही, असे त्यांनी कामगारांना सांगितले. त्यानंतर आता माघार नाही, अशी भूमिका कामगारांनी घेतली.

‘मातोश्री’वर विश्वास नाहीगेल्या वेळी मातोश्रीवर विश्वास ठेवून संप मागे घेतला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संपावर गप्प का? याबाबत जाणून घेतले असता, उद्धव ठाकरे यांनीच कामगारांना पैसे न देण्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे समजते, असा आरोप राव यांनी केला. शिवसेनेला बेस्ट उपक्रमाचे खासगीकरण करायचे आहे. आपल्याला देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करणाºयांनाच आपण आता देशोधडीला लावायचे आहे, असा हल्लाच त्यांनी या वेळी चढविला.इतिहास घडविणारहा संप फोडण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते उद्या कामावर चला, असा संदेश पसरवत आहेत. मात्र बेस्ट कामगारांचा गिरणी कामगार होऊ देणार नाही. उलट हा कामगार इतिहास घडविणार, असा दावा राव यांनी केला.न्यायालयाला साकडेकामगारांच्या मागण्यांबाबत न्यायालयाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती करणार असल्याचे राव यांनी सांगितले. आपले कुटुंब जगवायचे असेल तर या संपात सहभाग ठेवा. आपल्या घरी चूलच पेटणार नसेल तर आपण झेंडे कोणाचे हाती घेणार आहोत, असा सवाल त्यांनी या वेळी कामगारांना केला.

टॅग्स :बेस्टसंप