Join us  

'जिंकलो नसलो तरी हरलो नाही; पराभवाने खचू नका'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 5:59 AM

‘जिंकलो नसलो तरी हरलो नाही’ या शब्दात इन्स्ट्राग्रामवर आपल्या भावना व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांना पराभवाने खचून न जाण्याचे भावनिक आवाहन शनिवारी केले.

मुंबई/सातारा : ‘जिंकलो नसलो तरी हरलो नाही’ या शब्दात इन्स्ट्राग्रामवर आपल्या भावना व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांना पराभवाने खचून न जाण्याचे भावनिक आवाहन शनिवारी केले.लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे चारच खासदार निवडून येऊ शकले तर पुरस्कृत एक खासदार जिंकून आला. स्वत: पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे बारामतीतून जिंकल्या पण पवार यांचे नातू पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघात दारुण पराभव पत्करावा लागला. विधानसभा निवडणुकीला चार महिने बाकी असताना पवार यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून पक्ष कार्यकर्त्यांचे धैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभा निवडणुकीला नव्या जोमाने सामोरे जाण्याचे स्पष्ट संकेत ७९ वर्षीय पवार यांनी दिले आहेत.शनिवारी पवार यांनी सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागाचा दौरा केला. कोरेगाव तालुक्यातील दुष्काळी चिलेवाडी व नागेवाडी या गावांना भेट देऊन, तेथील पाहणी केली. ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत, त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंंदे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड उपस्थित होते.पवार म्हणाले, चिलेवाडी गावाने दुष्काळाशी दोन हात करत असताना अत्यंत चांगले आणि दर्जेदार काम केले आहे. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत जी गावे उतरली आहेत, त्यापैकी चिलेवाडीने अत्यंत मनापासून काम केले. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी गावांसाठी मी १ कोटी रुपये खासदार निधीतून देणार असून, त्यामध्ये चिलेवाडीचा समावेश आहे.>जिल्हाधिकाऱ्यांना फोन...शरद पवार यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंंघल यांच्याशी संपर्क साधून खासदार निधीतून चिलेवाडी गावासाठी करत असलेल्या निधीच्या तरतुदीची माहिती दिली. याबाबत आमदार शशिकांत शिंंदे हे तुमच्याशी समन्वय ठेवतील. त्यांना प्राधान्यक्रमाने सहकार्य करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

टॅग्स :शरद पवारलोकसभा निवडणूक २०१९महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019