मुंबई : बेकायदेशीररीत्या निधी जमविण्याच्या कृतीला लगाम घालताना शेअर बाजार नियामक सेबीने तीन प्रमुख कंपन्यांना लोकांकडून निधी घेण्यास तात्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. या कंपन्यांत एव्हरलाइट रीयलकान इन्फ्रास्ट्रक्चर लि, ट्रीस्टी सेक्युरिटीज लि. आणि रियल व्हिजन इंटरनॅशनल यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी सेबीच्या परवानगीविना प्रत्येकी ५० लोकांहून अधिक लोकांना शेअर देऊन पैसे जमा केले. नियमांनुसार, ५० हून अधिक गुंतवणूकदारांकडून निधी जमविणे सार्वजनिक रोखे श्रेणीत मोडते व त्यासाठी सेबीची परवानगी आवश्यक आहे. या नियमाचे वरील कंपन्यांकडून उल्लंघन झाले. त्यामुळे या कंपन्यांना निधी गोळा करण्यास बंदी घालण्यासह कंपनीशी संबंधित संचालकांना शेअर बाजारात व्यवहार करण्यापासून रोखले आहे. या कंपन्यांनी सामुहिकरित्या शेअर जारी करून सुमारे १२ हजार गुंतवणूकदारांकडून २९ कोटी रूपये गोळा केले आहे. नव्याने निधी प्राप्त करण्यास या कंपन्यांना मज्जाव करण्यात आला असून जनतेतून उभारण्यात आलेला निधी मोठ्या प्रमाणात न वळविण्याचे निर्देश या कंपन्यांना देण्यात आले आहेत. या कंपन्यांना त्यांच्याकडील मालमत्तेचे संपूर्ण विवरण सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
लोकांकडून निधी घेण्यास मज्जाव
By admin | Updated: March 24, 2015 02:09 IST