Join us  

एकलपीठाच्या निर्णयाविरोधात ज्ञानदेव वानखेडे अपिलात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 12:47 PM

सकृतदर्शनी नवाब मलिक यांनी केलेली ट्विट ही द्वेषातून व पूर्ववैमनस्यातून करण्यात आली, असे निरीक्षण न्यायालयाने आदेशात नोंदविले आहे.

मुंबई : मंत्री नवाब मलिक यांना वानखेडे कुटुंबीयांविरोधात वक्तव्य करण्यास मनाई न करण्याच्या उच्च न्यायालयाच्या एकलपीठाच्या निर्णयाविरोधात ज्ञानदेव वानखेडे खंडपीठापुढे अपिलात गेले आहेत. गुरुवारी या अपिलावरील सुनावणी होण्याची शक्यता आहे. वानखेडे कुटुंबीयांविरोधात वक्तव्य करण्यापासून नवाब मलिक यांना सरसकट बंदी घालण्यास न्या. माधव जामदार यांच्या एकलपीठाने मनाई केली. तर मलिक यांना वानखेडे यांच्याविरोधात वक्तव्य करताना सर्व तथ्य तपासूनच वक्तव्य करावे, असे न्या. जामदार यांनी बजावले. या निर्णयाला एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे आव्हान दिले आहे.सकृतदर्शनी नवाब मलिक यांनी केलेली ट्विट ही द्वेषातून व पूर्ववैमनस्यातून करण्यात आली, असे निरीक्षण न्यायालयाने आदेशात नोंदविले आहे. मलिक यांच्या जावयाला अटक केल्याने ते असे आरोप करीत आहेत. त्यामुळे मलिक यांना समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात वक्तव्य करण्यास मनाई करायला हवी होती, असे वानखेडे यांनी अपिलात म्हटले आहे. न्या. एस. जे. काथावाला व न्या. एम. एन. जाधव यांच्या खंडपीठापुढे बुधवारी अपील दाखल करण्यात आले. न्यायालयाने यावरील सुनावणी गुरुवारी ठेवली आहे.ऑक्टोबर महिन्यापासून मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध ट्विटर मोहीम उघडली. त्यांनी मलिक यांचे जावई समीर खान यांना जानेवारी महिन्यात ड्रग्ज प्रकरणी अटक केली व नऊ महिन्यांनी त्यांची जामिनावर सुटका झाली. या आकसापोटी मलिक आरोप करत आहेत, असे वानखेडे यांनी अपिलात म्हटले आहे.  

टॅग्स :नवाब मलिकसमीर वानखेडे