Join us

मद्यपी पत्नीपासून दिला घटस्फोट

By admin | Updated: November 12, 2015 03:01 IST

मद्यप्राशन करून पतीचा चारचौघात अपमान करणे, ही एक प्रकारची क्रूरता असून हे घटस्फोटाचे कारण ठरू शकते, असे म्हणत वांद्रे कुटुंब न्यायालयाने मद्यपी पत्नीपासून पतीला घटस्फोट दिला आहे.

मुंबई : मद्यप्राशन करून पतीचा चारचौघात अपमान करणे, ही एक प्रकारची क्रूरता असून हे घटस्फोटाचे कारण ठरू शकते, असे म्हणत वांद्रे कुटुंब न्यायालयाने मद्यपी पत्नीपासून पतीला घटस्फोट दिला आहे.प्रीती सिंग आणि अजय सिंग (बदलेली नावे) यांचा विवाह १९९९ मध्ये झाला. विवाहानंतर काहीच महिन्यांनी कामानिमित्त अजय कतारमध्ये गेले. प्रीतीने त्यांच्याबरोबर कतारला जाण्यास नकार दिला. काही महिन्यांनी मुंबईला परत आल्यानंतर अजय यांना अन्य ठिकाणी नोकरी मिळेना. प्रीती नोकरी करत होती, पण बेरोजगार पतीचा ती दररोज अपमान करायची, असे घटस्फोट याचिकेत म्हटले आहे.अजय यांनी केलेल्या याचिकेनुसार, प्रीती दररोज बेकारीवरून अजयचा पाणउतारा करत असे. अजयने तिला दररोज स्टेशनला सोडवावे आणि परत घ्यायलाही यावे, अशी प्रीतीची अपेक्षा होती. अजय कुठे जातो आणि काय करतो? यावरही प्रीतीचे लक्ष असे. प्रीती तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर अजयला मिसळून देई, पण संधी मिळाली, की त्यांच्यासमोर अजयाचा अपमान करे. तसेच मित्रमैत्रिणींना त्याच्याशी मैत्री न करण्याचा सल्ला देत असे. मित्रमैत्रिणींबरोबर मद्यप्राशन करून नेहमीच त्यांच्यासमोर प्रीती अजयचा अपमान करत असे. कुटुंब न्यायालयात ही सुनावणी एकतर्फी चालली. प्रतिज्ञापत्र वाचल्यानंतर असे स्पष्ट होते की, अर्जदाराने केलेले आरोप गंभीर आहेत. प्रतिवादीने दिलेल्या वागणुकीनंतर अर्जदार तिच्याबरोबर उर्वरित आयुष्य काढू शकत नाही, असे म्हणत कुुटुंब न्यायालयाने अजयला त्याची पत्नी प्रीतीपासून घटस्फोट दिला.