Join us

व्हॉट्सअपवर व्हिडीओ पाठवून तलाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 06:56 IST

वसई येथे राहणाऱ्या यावर खान यांनी पत्नी फरहा नाझला व्हॉट्सअपवर व्हिडीओ पाठवून तत्काळ तलाक दिला. या विरोधात पीडितेने न्याय मिळावा, अशी मागणी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

मुंबई : वसई येथे राहणाऱ्या यावर खान यांनी पत्नी फरहा नाझला व्हॉट्सअपवर व्हिडीओ पाठवून तत्काळ तलाक दिला. या विरोधात पीडितेने न्याय मिळावा, अशी मागणी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल करून घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला. तत्काळ तिहेरी तलाक बेकायदा असल्याचा निवाडा सर्वाेच्च न्यायालयाने दिल्यानंतरही असे प्रकार घडत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.२०१२ मध्ये या दाम्पत्याचे लग्न झाले होते. त्यानंतर घरगुती वाद व हुंड्याची सातत्याने होत असलेली मागणी व मारहाण याला कंटाळून पत्नीने माहेरी राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, वाद मिटत नसल्याचे पाहून न्यायालयात त्यांनी कौटुंबिक हिंसाचाराविरोधात दाद मागितली होती. त्यामुळे संतापलेल्या पतीने व्हॉट्सअपवर व्हिडीओ पाठवून पत्नीला तत्काळ तलाक देत असल्याचे जाहीर केले. नोव्हेंबर २०१७चे हे प्रकरण असून, आता पतीने दुसरे लग्न करण्यासाठी साखरपुडा केल्याचे समोर आल्यानंतर, पत्नीने समाजासमोर येण्याचा निर्णय घेतला.पतीला व्यवसायासाठी व दुकान घालण्यासाठी पत्नीने ९ लाख रुपयांचे दागिने तारण ठेवून बँकेतून कर्ज काढून दिले. मात्र, त्यानंतरही हुंंड्याची हाव कमी झाली नसल्याचा दावा फरहा नाझ यांनी केला. या वेळी त्यांचे वडील व वकील अ‍ॅड. रंजन राजगोर उपस्थित होते.पतीने तत्काळ तिहेरी तलाक देऊन सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान केल्या प्रकरणी, त्याच्याविरोधात उच्च व सर्वाेच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. राजगोर यांनी दिली. पतीने दुसरे लग्न करण्यापूर्वी पहिल्या पत्नीला देखरेखीसाठी खर्च मिळावा व तिचे दागिने परत मिळावेत, या मागणीसाठी कौटुंबिक न्यायालयात दावा केल्याची माहिती त्यांनी दिली. तत्काळ तलाक देऊन बेकायदा कृत्य करून पतीने फरहा नाझ यांचा मानसिक छळ केल्याचा मुद्दा याचिकेमध्ये मांडण्यात आला आहे. याबाबत ठाणे न्यायालयात प्रकरण सुरू असताना, पतीने न्यायालयाबाहेर मारहाण केल्यानंतर, पोलिसांनी एफआयआर नोंदविण्याऐवजी केवळ एनसी दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली.