जितेंद्र कालेकर, ठाणेशिवसेना भाजपाची ठाण्यात युती असली तरी गेल्या अनेक दिवसांपासून दोघांमध्ये धुसफूस सुरुच होती. त्यामुळे लोकसभा निवडणूक असो की महापालिका. दोघांचे झेंडे फक्त दिसायचे. रॅलीत नेत्यांचे फोटोही उसने अवसान आणल्यासारखे टाकले जात होते. भाजपाकडून कोणत्याही मुद्दयावरुन सेनेला कोंडीत पकडणे आणि शिवसेनेनेही भाजपाला गृहीत धरुन ‘राज-का-रण’ करणे हे सुरुच होते. त्यामुळे ठाण्यात तरी काडीमोड कधीच झाला होता, फक्त घटस्फोटाचा निर्णय तेवढा बाकी होतो, असेच एकमेकांचे कार्यकर्ते आता खासगीत बोलू लागले आहेत.गेल्या २५ वर्षांच्या या युतीला गेल्या काही वर्षांपासून वरीष्ठ नेत्यांमधील हेवेदाव्यांचे ग्रहण लागले होते. त्यात लोकसभा निवडणूकीनंतर नरेंद्र मोदीच्या लाटेमुळे तर भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांचा स्वबळाचा स्वर आणखी उंचावला होता. त्यामुळे नेहमीच्याच भावनिक ब्लॅकमेलिंगला शिवसेनाही कंटाळली होती. अगदी २०१२ च्या ठाणे महापालिकेच्या निवडणूकीपासून एकमेकांना शह काटशह देण्याचे राजकारण आणखीनच गडद होत चालले होते. युती आणि काँग्रेस आघाडी या दोघांकडे ६५ - ६५ चे संख्याबळ होते. त्यामुळे जे फुटतील त्यांना खूपच ‘भाव’ आला होता. त्यात भाजपाच्या सुहासिनी लोखंडे या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या महापौर निवडणूकीच्या वेळी अचानक ‘बे-पत्ता’ झाल्या होत्या. अर्थात, या सगळयामागे भाजपाचे प्रकाश नरसाणा आणि शहर अध्यक्ष मिलिंद पाटणकर यांचाच हात असल्याचा शिवसेनेने आरोप केला होता. दरम्यान, मनसेने ऐनवेळी सात नगरसेवकांचा पाठींबा युतीला दिल्यामुळे युतीचे पारडे जड झाले आणि लोखंडेबाई देखिल अत्यंत नाटयमयरित्या पाच दिवसांनंतर अचानक महापौर निवडणूकीला हजर झाल्या आणि त्यांनी आपण निष्ठावंतर असल्याचे दाखवत युतीला मतदान केले. पुढे परिवहन समिती सभापती निवडणुकीच्या दगाबाजीनंतरही लोकसभा निवडणूकीला भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते फारसे दिसले नाही. संजय केळकर हे तर पालघर आणि भिवंडीला होते. तर पाटणकर आपल्यावर शिवसेनेसह भाजपानेही कसा अन्याय केला, हेच वारंवार सांगत होते. एकूणच गेल्या दोन ते तीन वर्षांच्या घडामोडी पाहिल्यास युतीमध्ये बेबनाव कधीच झाला होता. याला फक्त जागा वाटपाचे निमित्त मिळाले आणि उभयंतांनी फारकत घेतली, असेच आता दोन्हीकडचे कार्यकर्ते बोलू लागले आहेत.
आत्ता घटस्फोट झाला!
By admin | Updated: September 27, 2014 00:13 IST