Join us

दारूच्या सवयीला कंटाळून दिला घटस्फोट, महिलेच्या बाजूने एकतर्फी घटस्फोटाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 02:36 IST

नव-याकडून सततची मारझोड, दारू पिऊन येणे, कामावर गैरहजर राहणे, या कारणांमुळे चेंबूर येथील महिलेने नव-याला घटस्फोट दिला.

मुंबई : नव-याकडून सततची मारझोड, दारू पिऊन येणे, कामावर गैरहजर राहणे, या कारणांमुळे चेंबूर येथील महिलेने नव-याला घटस्फोट दिला. वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने या दाम्पत्याच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. न्यायालयाने प्रति महिना अडीच हजार रुपये पोटगीला मंजुरी दिली आहे.चेंबूर येथे राहणारे मंगेश आणि शारदा (नावात बदल) यांचा २००३ साली जालना येथील मंगेशच्या गावी विवाह पार पडला. मंगेशला बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कामगाराची नोकरी मिळणार असल्याचे, मंगेशच्या परिवाराने शारदाच्या परिवाराला लग्नाअगोदर सांगितले. त्यामुळे शारदा आणि मंगेश यांचे लग्न लागले. मंगेशला काही महिन्यांनंतर वडिलांच्या जागेवर महापालिकेमध्ये नोकरी लागली. दरम्यान, मंगेश आणि शारदाला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. स्वत:च्या परिवाराची जबाबदारी सांभाळण्याऐवजी मंगेशने दारूचे व्यसन सुरू ठेवले. त्यात मंगेश कामावर सतत गैरहजर राहू लागला. घरात पैशांची चणचण भासू लागल्याने जबाबदारी ओळखून शारदाने नोकरी स्वीकारली.मंगेशच्या दारूच्या सवयीला, मारझोडीला कंटाळून, फेब्रुवारी २०१६मध्ये शारदाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. खटल्याच्या प्रत्येक तारखेला मंगेश न्यायालयात गैरहजर राहिला. मंगेशने जालना येथे दुसरे लग्न केल्याचा संशय शारदाने न्यायालयात बोलून दाखविला. त्यानंतर, शारदाचा घटस्फोटाचा निर्णय पक्का झाला. मंगेश न्यायालयात येत नसल्यामुळे कुटुंब न्यायालयाने महिलेच्या बाजूने एकतर्फी घटस्फोटाचा निर्णय दिला. कुटुंब न्यायालयात अ‍ॅड. अरविंद जोशी यांनी शारदाचा खटला चालविला.>मुलांसाठी पोटगी मंजूरशारदा आणि मंगेशला दोन मुले आहेत. मोठा मुलगा १२ वर्षांचा असून, सहाव्या इयत्तेत शिकत आहे, तर लहान मुलगी १० वर्षांची असून, चौथीत शिकत आहे. शारदाने स्वत:साठी पोटगी मागितली नसून, मुलांच्या शिक्षणासाठी पोटगीचा अर्ज केला.कौटुंबिक न्यायालयाने दोन्ही मुलांना प्रत्येकी २ हजार ५०० रुपयांची पोटगी मंजूर केली आहे.