Join us

सुसंवादातून घटस्फोट टाळणे शक्य

By admin | Updated: April 10, 2017 06:33 IST

धकाधकीची जीवनशैली आणि वाढत्या ताणतणावामुळे महानगरांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे

मुंबई : धकाधकीची जीवनशैली आणि वाढत्या ताणतणावामुळे महानगरांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी जोडीदारांतील परस्परातील संवाद वाढविण्याची गरज आहे, असे मत कौटुंबिक न्यायालयामध्ये आयोजित कार्यशाळेत व्यक्त करण्यात आले. मुंबई सायकॅट्रीक क्लिनिकने जागतिक आरोग्य दिनानिमित्त वांदे्र येथील कौटुंबिक न्यायालयामध्ये ‘सुखी आयुष्याचे गुपित’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेमध्ये डॉ. देवेंद्र सावे, डॉ. नीरज शेट्टी, डॉ. चिन्मयी कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कौटुंबिक न्यायालयातील वकील, दावेदार आणि कौटुंबिक न्यायालयातील कर्मचारी यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. या कार्यशाळेमध्ये मानवी जीवनामध्ये येणारी उदासीनता या विषयावर चर्चा करण्यात आली. आपल्यामध्ये उदासीनता का येते? त्यामागची कारणे, त्याचे निदान आणि त्यावरील उपचार यांवर डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. धकाधकीच्या जीवनामुळे येणारा ताणतणाव व कौटुंबिक जीवनामधील वाद-विवादांमुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. या विषयावर दावेदार आणि डॉक्टरांमध्ये चर्चा रंगली. ताण-तणावांवरील उपचाराच्या वैद्यकीय मार्गांसह उर्वरित मार्गांवर डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. अशा कार्यशाळा महाराष्ट्रभर घेऊन लोकांमध्ये जनजागृती आणि लोकांना मार्गदर्शन करण्याची इच्छा आयोजकांनी व्यक्त केली. कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश एम.एम. ठाकरे व इतर न्यायाधीश, न्यायालय व्यवस्थापक पी.सी. मठपती, कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी कार्यशाळेला हजेरी लावली होती. (प्रतिनिधी)