Join us

जिल्ह्यात कुटुंब वाळीत प्रथा निर्मूलन अभियान सुरू

By admin | Updated: December 19, 2014 00:03 IST

सामाजिक बहिष्कार व वाळीत टाकण्याच्या घटनांमुळे रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठी सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली आहे.

अलिबाग : सामाजिक बहिष्कार व वाळीत टाकण्याच्या घटनांमुळे रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठी सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. यासंदर्भात गुन्हे देखील दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण वा दोषी कोण याच्या चर्चांच्या पलीकडे जावून समाजप्रबोधन व जनजागृती करण्याच्या हेतूने अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटना व रायगड जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण रायगड जिल्ह्यात ‘सामाजिक बहिष्कार व कुटुंब वाळीत प्रथा निर्मूलन अभियान’ आयोजित केल्याचे रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी सांगितले.शालेय विद्यार्थी आत्महत्यांच्या सामाजिक समस्येला आळा घालण्याकरिता अभिव्यक्ती समर्थनने रायगड जिल्हा पोलिसांच्या सहयोगाने ‘चला मुलांना घडवू या’ हे अभियान प्रभावीपणे राबवून जनजागृती करुन जिल्ह्यात सकारात्मक परिणाम साध्य केले होते. याच पार्श्वभूमीवर, रायगड जिल्ह्यातील सामाजिक बहिष्कार व वाळीत प्रकरणांच्या अनुषंगाने अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाकरिता ‘सामाजिक बहिष्कार व कुटुंब वाळीत प्रथा निर्मूलन अभियान’ हा प्रस्ताव जिल्हाधिकारी भांगे यांना सादर केला. त्यावर अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेचे सदस्य जयंत धुळप, आविष्कार देसाई, अ‍ॅड.रत्नाकर पाटील, सुयोग आंग्रे, प्रमिला जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, जिल्हाधिकारी कार्यालयाचे चिटणीस अजित नैराळे यांच्या समवेत जिल्हाधिकारी भांगे यांनी बुधवारी तत्काळ बैठक घेवून हा निर्णय घेतला. ‘सामाजिक बहिष्कार व कुटुंब वाळीत प्रथा निर्मूलन अभियाना’ करिता रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांची समन्वयक म्हणून जिल्हाधिकारी भांगे यांनी नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)