मुंबई: जमनालाल बजाज फाऊंडेशनतर्फे आयोजित 37 वा जमनालाल बजाज पुरस्कार सोहळा आज नरीमन पॉईंट येथील एनसीपीए येथे पार पडला. हे पुरस्कार नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या हस्ते विजेत्यांना प्रदान करण्यात आले. जमनालाल बजाज यांच्या जयंतीप्रित्यर्थ दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात.
यावेळी कर्नाटकातील जनपद सेवा ट्रस्टचे संस्थापक सुरेंद्र कौलगी, गुजरातमधील शिक्षण वसाहत ट्रस्टचे संचालक रामकुमार सिंग, आंध्रप्रदेशातील वास्तव्य महिला मंडळाच्या अध्यक्षा चेन्नुपती विद्या, थायलंडमधील इंटरनॅशनल नेटवर्क ऑफ एंगेज्ड बुद्धिस्टचे संस्थापक सुलक सिवारस्का या गांधीवादी सामाजिक कार्यकत्र्याना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष, विश्वस्त राहुल बजाज आणि न्यायमूर्ती सी.एस. धर्माधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विज्ञान-तंत्रज्ञान क्रांतीचा प्रामुख्याने फायदा हा शहरी भागात आणि संघटित उद्योग क्षेत्रला झाल्याचे दिसून येते. परंतु. तंत्रज्ञान तळागाळात पोहोचायला हवे. विशेषत: असंघटित क्षेत्रच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या उन्नतीसाठी वापर व्हायला हवा. तर समाजातील एक दरी भरून निघेल.
- राम कुमार सिंग, जमनालाल बजाज पुरस्कार विजेते (ग्रामविकास विभाग)
आजही आपल्या देशात पुरुष आणि महिला यातील दरी भरून निघालेली नाही, ही निश्चितच वैषम्याची बाब आहे. पण, नुसते कायदे करून हा प्रश्न सुटणार नाही. पुरुषांची मानसिकता बदलण्यासाठी मोठय़ा प्रबोधनाची गरज आहे. यातूनच ही दरी भरली जाईल आणि परिवर्तनाची प्रक्रिया पूर्ण होईल.
- चेन्नुपती विद्या, जमनालाल बजाज पुरस्कार विजेते (महिला व बालकल्याण विभाग)