Join us  

उडाण अंतर्गत हवाई मालवाहतुकीद्वारे देशात एका दिवसात ३९ टन वैद्यकीय सामग्रीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 4:29 PM

कोरोनामुळे देशात लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात देशात २४० टन मालाची वाहतूक हवाई मार्गाने करण्यात आली आहे.  

मुंबई ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध भागात वैद्यकीय सामग्री पोचवण्यात उडाण अंतर्गत हवाई मालवाहतुकीचा मोठा सहभाग राहिला. मंगळवारी एका दिवसात देशात ३९.३ टन वैद्यकीय सामग्रीची वाहतूक केली गेली. लाईफलाईन उडाण अंतर्गत दिवसभरात देशात १६१ विमानांनी उड्डाणे केली. याद्वारे  वैद्यकीय सामग्री देशाच्या विविध भागात पोचवली गेली. कोरोनामुळे देशात लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात देशात २४० टन मालाची वाहतूक हवाई मार्गाने करण्यात आली आहे.  

लाईफलाईन उडाण अंतर्गत उड्डाण केलेल्या १६१ विमानांमध्ये ९९ विमाने एअर इंडिया व अलायन्स एअरने चालवली तर ५४  विमाने भारतीय हवाई दलातर्फे चालवण्यात आली. या १६१ विमानांनी एक लाख ४१ हजार ८० किमी अंतर पार केले. आंतरराष्ट्रीय मार्गावर एअर इंडियाने हॉंगकॉंगमधून सव्वा सहा टन वैद्यकीय उपकरणांची वाहतूक केली. तर एअर इंडियाच्या विमानांनी कोलंबोला पावणे नऊ टन मालाचा पुरवठा केला. एअर इंडियाची चार विमाने, अलायन्स एअरची दोन विमाने,भारतीय हवाई दलाची तीन विमाने अशा एकूण ९ विमानांनी ही उड्डाणे केली.  जम्मू काश्मिर लडाख इशान्य भारत या ठिकाणी प्रामुख्याने ही वैद्यकीय सामग्री पोचवण्यात आली. 

याशिवाय, विविध खासगी विमान कंपन्यांनी देखील हवाई मालवाहतूक केली आहे. स्पाईसजेटने २४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत २०३ मालवाहू विमानांचे उड्डाण केले त्याद्वारे २ लाख ७७ हजार ८० किमी अंतर पार करुन १६४७.५९ टन मालवाहतूक केली. त्यामध्ये ५५ आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश होता. इंडिगोने ८ मालवाहू विमानांद्वारे ३ व ४ एप्रिलला ६१०३ किमी अंतर पार करुन ३.१४ टन मालवाहतूक केली. ब्ल्यू डार्टने २५ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत देशांतर्गत ६४ मालवाहू विमानांचे उड्डाण केले त्याद्वारे ६२ हजार २४५ किमी अंतर पार करुन ९५१.७३ टन मालवाहतूक केली. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासी हवाई वाहतुकीला १५ एप्रिल पर्यंत बंदी आहे. मात्र या कालावधीत हवाई मालवाहतूक करण्यासाठी डीजीसीए ने विमान कंपन्यांना प्रवासी विमानांचा वापर करण्याची विशेष परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी विविध अटींचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याऔषधंकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस