Join us  

मतदानासाठी 'म्हैसूर शाई'च्या 3 लाख बाटल्यांचं वाटप, जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 6:53 PM

म्हैसूर शाई तयार करणारी ही कंपनी कर्नाटक सरकारच्या अंतर्गत कार्यरत असून भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी शाईचा पुरवठा करण्याचे एकमेव कंत्राट याच कंपनीला दिले आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात 'म्हैसूर शाईच्या' तीन लाख बाटल्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी ही शाई बोटावर लावताच 15 सेकंदांमध्ये तिचा ओलसरपणा नष्ट होतो. त्यामुळे कितीही  प्रयत्न केले तरी ती पुसली जात नाही. ही शाई म्हैसूर येथील 'म्हैसूर पेंटस्  अ‍ॅण्ड वॉर्निश लिमिटेड कंपनी' मध्ये तयार केली जाते. 

म्हैसूर शाई तयार करणारी ही कंपनी कर्नाटक सरकारच्या अंतर्गत कार्यरत असून भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी शाईचा पुरवठा करण्याचे एकमेव कंत्राट याच कंपनीला दिले आहे. त्यामुळे या शाईला 'म्हैसूरची शाई' म्हणून ओळखले जाते.2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघांत 96 हजार 661 मतदान केंद्र असतील. या सर्व केंद्रावर म्हैसूर शाईच्या बाटल्या पोहोचविण्याचे काम सुरु आहे. मतदानापूर्वी मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर त्याची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदान अधिकारी मतदाराच्या डाव्या तर्जनीवर लावलेल्या शाईची तपासणी करतात. डाव्या तर्जनीची तपासणी करु न देणारी व्यक्ती मतदानासाठी  अपात्र ठरु शकते.  जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.

 

टॅग्स :मतदाननिवडणूकभारतीय निवडणूक आयोगविधानसभा निवडणूक 2019