नवी मुंबई : वाशी येथील रहिवाशाला वीज वितरणने गेल्या तीन महिन्यात ४१ हजार रुपयांचे वीज बिल पाठवले आहे. विजेचा अधिक वापर नसतानाही त्यांना गेली तीन महिने भरमसाट बिल येत आहे. वाशी सेक्टर १४ येथील महात्मा गांधी कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या उत्तम भनगे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना वीज वितरणकडून येणाऱ्या भरमसाट बिलांचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. जून महिन्यात त्यांना राहत्या घराचे वीज बिल १४ हजार ५०० रुपये आले होते. यापूर्वी सुमारे ३ हजार रुपयेपर्यंत येणारे वीज बिल अचानक १४ हजार रुपयांपर्यंत गेल्याने त्यांनी थेट वीज वितरणचे कार्यालय गाठले. परंतु यावेळी त्यांना वाशी विभागातील वीज वितरणच्या अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरेच मिळाली. त्यांचा अर्ज एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे पाठवण्यातच तीन महिन्यांचा कालावधी गेल्या. या दरम्यान त्यांचे वीज बिल देखील वाढत जावून ते एकूण ४१ हजार रुपयांपर्यंत पोचले आहे. भनगे यांच्या घरामध्ये प्रतिमहिना सुमारे ४०० युनिटपर्यंतच्या विजेचा वापर होतो. याप्रमाणे त्यांना चार हजार रुपयांपर्यंतचे वीज बिल यायचे. मात्र जून महिन्यापासून विजेचा वापर तेवढाच असतानाही मीटर रिडिंगमध्ये १२०० युनिटपर्यंतचा वापर दिसू लागला आहे. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात घरात विजेचा वापर होतच नसल्याचे उत्तम भनगे यांचे म्हणणे आहे. तक्रारीनुसार वितरणच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या मीटरद्वारे रिडिंग घेतले असता त्यामध्येही हे स्पष्ट झाल्याचे भनगे यांनी सांगितले. मात्र वस्तुस्थिती समोर असतानाही येणारे वाढीव बिल कमी करण्यास वीज वितरणचे अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)
विजेच्या भरमसाट बिलामुळे नागरिकांमध्ये असंतोष
By admin | Updated: August 26, 2014 01:08 IST