Join us

पालिका अभियंत्यांच्या बढतीवरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:05 IST

मुंबई : मुंबई महापालिकेतील अभियंत्यांना बढती देण्याचा प्रस्ताव स्थापत्य समितीच्या बैठकीत नुकताच मंजूर करण्यात आला, मात्र अभियंत्यांच्या बढतीमध्ये आर्थिक ...

मुंबई : मुंबई महापालिकेतील अभियंत्यांना बढती देण्याचा प्रस्ताव स्थापत्य समितीच्या बैठकीत नुकताच मंजूर करण्यात आला, मात्र अभियंत्यांच्या बढतीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच सदस्यांना अंधारात ठेवून सत्ताधारी शिवसेनेने प्रस्ताव झटपट मंजूर केल्याची नाराजीही व्यक्त केली आहे. त्यामुळे पालिका महासभेत या प्रस्तावावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

कोणताही प्रस्ताव सभेच्या तीन दिवस आधी पटलावर मांडावा लागतो. मात्र पालिकेतील तब्बल १३२ अभियंत्यांना बढती देण्याचा प्रस्ताव स्थापत्य समितीच्या पटलावर मांडण्यासाठी आदल्या दिवशी संध्याकाळी त्याची प्रत सदस्यांच्या घरी पाठवण्यात आली, तसेच ऑनलाइन बैठकीत कोणतीही चर्चा न करता हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. मुंबई महापालिकेच्या १०५ सहाय्यक अभियंत्यांना कार्यकारी अभियंतापदी बढती आणि २७ कार्यकारी अभियंत्यांना उपप्रमुख अभियंतापदी बढती देण्यात येणार आहे.

हे आहे वादाचे कारण

बढती देण्यात आलेल्या १३२ अभियंत्यांची नावं प्रस्तावात असली तरी त्यापैकी कोणावर गुन्हे आहेत का, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत का, याबाबत माहिती प्रस्तावात दिलेली नाही, असे काँग्रेसने निदर्शनास आणले, तर काही अभियंत्यांना डावलून ही बढती देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या बढत्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहारही झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थापत्य समितीची मंजुरी मिळाल्यामुळे हा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी पालिका सभागृहाच्या पटलावर मांडण्यात येणार आहे.

विषय पुन्हा चर्चेसाठी आणण्याची मागणी

स्थापत्य समितीमध्ये सदस्य असलेले काँग्रेसचे नगरसेवक सुफियान वणू यांनी ही बैठक सुरू झाल्यानंतर तासाभराने लिंक मिळाली व तोपर्यंत विषय मंजूर करण्यात आला होता, असा आरोप केला आहे. त्यामुळे हे विषय पुन्हा स्थापत्य समितीच्या पटलावर चर्चेसाठी आणावे, अशी मागणी वणू यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.