Join us  

'मास्क' न घातलेल्या तरुणांची गाडी पोलिसांनी अडवल्याने वाद; व्हायरल व्हिडीओमुळे गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 1:07 AM

अंत्यसंस्कार करून परतल्याचे समजताच सोडले

मुंबई : रविवारी बोरीवलीमध्ये नाकाबंदी दरम्यान मास्क न घालता चारपेक्षा अधिक लोकांचा समावेश असलेल्या गाडीला पोलिसांनी अडविले. मात्र ते लोक नातेवाइकाचा अंत्यसंस्कार करून परतत असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी ती गाडी सोडून दिली. मात्र यादरम्यान ‘मिस कम्युनिकेशन’मुळे झालेल्या बाचाबाचीचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि बराच गोंधळ उडाला.

बोरीवलीच्या दौलतनगर स्मशानभूमीमध्ये एका वृद्धेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीय रविवारी गेले होते. त्या दरम्यान एक तरुणी चक्कर येऊन खाली कोसळली. त्यामुळे तिला रुग्णालयात हलविण्यासाठी तिचे नातेवाईक एका गाडीमध्ये बसून लगबगीने रुग्णालय शोधू लागले. बोरीवली पश्चिम द्रुुतगती महामार्गावर कस्तुरबा पोलिसांच्या हद्दीत नाकाबंदी सुरू होती.

गाडीत सहा लोक आणि त्यापैकी दोघा-तिघांनी मास्क घातले नसल्याने एका अधिकाऱ्याने ती गाडी अडवली आणि चौकशी करताना चालकाकडे वाहनचालक परवाना तसेच कागदपत्रांची विचारणा केली. यावरून पोलीस आणि चालकासह गाडीतील अन्य लोकांनीही पोलिसांसोबत वाद घालत त्याचे व्हिडीओ शूटिंग करत नंतर तो व्हिडीओ व्हायरल केला. याबाबत कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वपोनि. नामदेव शिंदे यांना विचारले असता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही नाकाबंदीदरम्यान फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहोत.

फिजिकल डिस्टन्सचे नियम आवश्यक

मात्र रविवारचा प्रकार हा निव्वळ गैरसमजामुळे घडला. मात्र ते लोक अंत्यसंस्कार करून परतत असल्याची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी ती गाडी सोडून दिल्याचे सांगितले. च्व्हिडीओ व्हायरल झाल्याने गोंधळ उडाला. फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहोत, असे पोलिसांनी सांगितले़

टॅग्स :पोलिस