मुंबई : महाराष्ट्र सदनात शिवसेना खासदारांनी केलेली जोरजबरदस्ती योग्य नाही, अशी नाराजी व्यक्त करीत सदनातील सोयीसुविधांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्य सचिवांना दिले. लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी ओळखून वर्तणूक ठेवणो आवश्यक आहे, अशी टिप्पणी देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
आज मुख्यमंत्र्यांनी निवासी आयुक्त बिपीन मलिक यांच्याशी चर्चा करून वस्तुस्थितीची माहिती घेतली. ते म्हणाले, की महाराष्ट्र सदनातील सुविधांबाबत लोकप्रतिनिधींनी आक्षेप नोंदविले आहेत. सदनातील उपाहारगृह चालविण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने ‘आयआरसीटीसी’ या रेल्वेच्या कंपनीला कंत्रट दिले होते. या कंपनीच्या सेवेबाबत आक्षेप असल्याने त्यांची सेवा बंद करून पर्यायी व्यवस्था केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.