मुंबई : समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून नागपाडा येथील कामाठीपुरा परिसरातून तीन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली होती. मात्र, पैशांसाठी नागपाडा पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने त्या मुलींची पुन्हा कुंटणखाण्यातच रवानगी केल्याची धक्कादायक माहिती १४ वर्षांनी उघडकीस आली. या प्रकरणात निवृत्त पोलीस निरीक्षक कलंदर शेख (६८) याला औरंगाबाद येथून अटक करण्यात आली आहे. तर त्याच्या साथीदार रवींद्र पांडेला कामाठीपुरा येथून बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
नागपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००४ मध्ये कामाठीपुरा येथून १३ ते १४ वर्षांच्या तीन मुलींची समाजसेवा संस्थेच्या माहितीद्वारे शेखच्या नेतृत्वाखालील पथकाने सुटका केली होती. तेव्हा शेखने या मुलींची रवानगी बालसुधार गृहात करणे गरजेचे होते. मात्र, शेखने या मुलींना कामाठीपुरातील दलाल रवींद्र पांडे (६०)च्या मदतीने कुंटणखाना चालविणाऱ्या मीरा तमंग या महिलेच्या हवाली केले. २००५ पासून त्या मुली महिला दलालाकडेच वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती संस्थेला मिळाली. त्यांनी याबाबत पोलीस आयुक्तांना कळविले. त्यानुसार, समाजसेवा शाखेने सापळा रचून त्या मुलींची तेथून सुटका केली. तपासात, एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या मदतीने त्यांना पुन्हा तेथे नेण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, काहीही हाती लागले नाही.