मुंबई : दक्षिण मुंबईतील नेहमी वर्दळ असलेल्या परिसरातून एका ७२ वर्षांच्या वृद्धाचा निर्घृण खून करुन दरोडा घालण्याच्या घटनेचा छडा लावण्यात पायधुनी पोलिसांना पाच तासात यश आले. याप्रकरणी एका तरुणीसह तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून लुबाडलेला ऐवज जप्त करण्यात आला आहे. राहत रशीद पठाण (वय २३), मुझमिल अशरुल शेख (२६), मुस्तफा अहमद (२६) अशी त्यांची नावे असून पैशांसाठ हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.पायधुनीतील इकबाल महमंद शहा दरवेश याची शनिवारी सायंकाळी निर्घृणपणे हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. इस्रायल मोहल्ल्यातील साई मंझिल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यवरील ३०४ फ्लॅटमध्ये रहात असलेल्या दरवेश यांचे हातपाय बांधून हल्लेखोरांनी त्यांच्या तोंडात बोळा कोबला. त्यानंतर तलवारीने वार करुन मारले. सांयकाळी त्यांचा नातू घरी आला असता हा प्रकार उघडकीस आला. इकबाल हा परिसरातील दारुवाली म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या जेनाबाई यांचा पूत्र असून डी गॅँगचा खबऱ्या म्हणूनही तो काम करीत होता. त्यामुळे त्याच्या हत्येमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. इकबाल यांचे दोन विवाह झाले असून दुसऱ्या पत्नीचे नुकतेच निधन झाले आहे.घटस्फोटित पत्नीची बहिण त्यांच्या घरी येत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी चौकशी केली असता गोंवडीत राहणाऱ्या राहतला ताब्यात घेतले. तिने शहा यांच्याकडे पैसे असल्याने मुझमिल व मुस्तफा याच्या साथीने खून केल्याची कबुली दिली. हत्येनंतर ते सोन्याची अंगठी व १५ हजार रुपये घेवून पसार झाले होते. त्यांच्याकडून ऐवज जप्त करण्यात आल्याचे परिमंडळ-२ चे आयुक्त प्रविण पडवळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
हत्येचा पाच तासात उलगडा
By admin | Updated: January 9, 2017 07:04 IST