Join us  

चर्चेसाठी या, नाहीतर घरी बैल पाळा! बैलगाडा शर्यतीवरून आयोजकांचा खोचक सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 4:29 PM

बैलगाडी शर्यतीला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतरही काही प्राणिमित्र संघटना वारंवार न्यायालयात जात आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण असल्यास प्राणिमित्रांनी चर्चेसाठी यावे, नाहीतर घरी बैल पाळावा, असे खोचक आवाहन अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्राला बैलगाडी शर्यतीची जुनी परंपरा.तामिळनाडू व कर्नाटक राज्यांमध्ये बैलगाडा शर्यत चालू.चर्चेसाठी या, नाहीतर घरी बैल पाळा.

मुंबई, दि. 19  -  बैलगाडी शर्यतीला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतरही काही प्राणिमित्र संघटना वारंवार न्यायालयात जात आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण असल्यास प्राणिमित्रांनी चर्चेसाठी यावे, नाहीतर घरी बैल पाळावा, असे खोचक आवाहन अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.यावेळी संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण टाकळकर म्हणाले की, महाराष्ट्राला बैलगाडी शर्यतीची जुनी परंपरा आहे. बैलगाडी शर्यतीसाठी केलेल्या आंदोलनानंतर शेतक-यांच्या हितासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात कायदा मंजुर करून घेतला. मात्र यावेळी नवीन अटी व नियमावलींचे वेसनही घालण्यात आले. मात्र तरीही काही स्वयंसेवी संघटना आणि प्राणिमित्र संस्थांनी नविन कायदा व अटींना मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत शर्यतींमध्ये पुन्हा अडथळा निर्माण केला आहे. परिणामी, तामिळनाडू व कर्नाटक राज्यांमध्ये बैलगाडा शर्यत चालू झाल्या असून महाराष्ट्रात अद्याप शर्यती बंद आहेत.मुळात प्राणिमित्र संघटना आणि संस्थांना घोड्यांच्या शर्यती कशा चालतात, असा सवालही संघटनेने उपस्थित केला आहे. घोड्यांच्या शर्यतीत तर घोड्यावर बसून त्यांना पळवण्यासाठी मारहाणही केली जाते. याउलट बैलगाडा शर्यतीत बैलावर कोणीही बसत नाही किंवा मारहाण करत नाही. घोड्यांची रेस खेळणारा मालक घोड्याला स्वत: जवळ ठेवत नाही. याउलट बैलगाडा शर्यतीमधील बैलाला शेतकरी स्वत: सांभाळत असतो. त्यामुळे सर्व प्राणी मित्रांनी संघटनेसोबत चर्चा करून या मुद्द्यावर तोडगा काढण्याची विनंती आयोजकांनी केली आहे. नाहीतर प्राणीमित्रांनी आपापल्या घरी बैल पाळावा, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :मुंबई