डहाणू : डहाणू नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी सकाळी डहाणूच्या कम्युनिटी हॉल येथे शहरातील अडी, अडचणी समस्या तसेच होणाऱ्या विकासकामां बाबतीत चर्चा होऊन खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.डहाणू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मिहिर शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सर्वप्रथम स्थायी समिती व विषयी समितीच्या ठरावाचे वाचन करून नगरसेवकांच्या विविध प्रश्नांचे उत्तर मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी दिले. यावेळी भुयारी गटार योजना, प्राप्त निविदांना मंजुरी देणे, सागरनाका येथे बसस्टॉप बांधणे, सागरी महामार्ग येथे बांधा वापरा हस्तांतरीत करा तत्वावर शौचालय बांधणे, घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी पी. डी. ए. मशीन व इतर साहित्य खरेदीबाबत तसेच वार्षिक कला, क्रिडा स्पर्धा आयोजित करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आले.यावेळी ज्येष्ठ नगरसेवक व बांधकाम सभापती शशीकांत बारी यांनी डहाणू नगरपरिषद हद्दीत झालेल्या व शासनाकडे सादर केलेल्या विकासकामे प्रथम झाल्यानंतरच नवीन कामांना मंजुरी देण्याबाबतची सुचना केली तर यावेळी नगरपरिषदेकडे प्राप्त एमआरटीपीचे कलम ३७ (१) अन्वये प्राप्त प्रस्तावाना मान्यता देणे बाबतचा प्रस्ताव चर्चेला आला असता नगराध्यक्ष मिहिर शाह यांनी प्रथम विकास आराखड्याला अंतिम मंजुरी मिळाल्यावर सर्वांचे प्रस्तावाना मान्यता देण्यात येईल असे उत्तर दिले.आजच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक राजेश पारेख, विरोधी पक्षनेते भरतसिंग राजपुत, शमी पीरा, प्रदिप चाफेकर, श्रावण माच्छी, रोकसाना मझदा, रमीला पाटील, सईद शेख, रमेश काकड इ. नगरसेवक तसेच नगरसेविका उपस्थित होते. (वार्ताहर)
सर्वसाधारण सभेत विकासकामांबाबत चर्चा
By admin | Updated: November 21, 2014 22:55 IST