Join us  

कोळ्याच्या नव्या प्रजातीचा शोध; अभिनंदन वर्धमान यांच्या नावाने ओळखला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 3:25 AM

अहमदाबाद येथील गुजरात युनिव्हर्सिटी कॅम्पसमधील संशोधन

- सागर नेवरेकर मुंबई: अहमदाबाद येथील गुजरात युनिव्हर्सिटी कॅम्पसमधून नव्या प्रजातीच्या कोळ्याचा शोध लागला आहे. वन्यजीव संशोधक ध्रुव प्रजापती यांनी हा कोळी शोधला आहे. ‘विंग कमांडर अभिनंदन वर्धमान’ यांच्या नावे म्हणजेच ‘फ्लेग्रा अभिनंदन वर्धमान’ नावाने हा कोळी ओळखला जाणार आहे. तसेच फ्लेग्रा या कुळातील हा कोळी आहे.गांधीनगर स्थित गीर फाउंडेशन येथे वन्यजीव संशोधक धु्रव प्रजापती यांनी ‘फ्लेग्रा अभिनंदन वर्धमान’ या कोळ्याचा शोध लावण्यापूर्वी १० कोळ्यांच्या प्रजातींचा शोध लावला आहे. नव्या प्रजातीच्या कोळ्याची शरीररचना ही तामिळनाडू येथे आढळणाऱ्या ‘फ्लेग्रा प्रसन्ना’या प्रजातीच्या कोळ्याशी मिळतीजुळती आहे. परंतु दोन्ही प्रजातींमधील प्रजनन प्रक्रियेमध्ये वेगळेपण दिसून येते. प्रजापती यांचे हे स्वतंत्र संशोधन आहे.सध्या नर कोळी सापडला असून, तो जम्पिंग स्पायडर आहे. तसेच छोटे कीटक हे या कोळ्याचे खाद्य आहे. कोळ्याचे संपूर्ण शरीर काळ्या रंगाचे असून त्याचे पाय तांबूस रंगाचे आहेत. २०१५ साली कोळ्यांची नवी प्रजात मिळाली होती. २०१८-१९ या वर्षामध्ये या कोळ्याचा सखोल अभ्यास करण्यात आला. ‘फ्लेग्रा अभिनंदन वर्धमान’ या नव्या प्रजातीची नोंद रशिया जनरल अथ्रोपोडा सेलेक्टा येथे करण्यात आली आहे, अशी माहिती प्रजापती यांनी दिली.

टॅग्स :अभिनंदन वर्धमान