मुंबई : मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने प्रचाराचा जोर आणखी वाढत आहे. काही दिवसच शिल्लक असल्याने उमेदवारांकडून आता प्रचार काटेकोरपणे केला जात असून, त्याचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने केला जात आहे. यासाठी उमेदवारांकडून दिवसातील तीन वेगवेगळ्या प्रकारे मतदारांशी संवाद साधला जात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १५ आॅक्टोबरला मतदान होणार असून, १९ आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे प्रचारफेऱ्या आणि रॅलींसाठी अवघे काही दिवसच शिल्लक असून, उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह मतदारसंघ पिंजून काढत आहेत. १५ आॅक्टोबरला मतदान होणार असल्याने १३ आॅक्टोबरला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रचार संपत आहे. त्यामुळे प्रचारफेऱ्या, रॅली यांचे नियोजन सगळ्याच राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून केले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आता ११ आणि १२ आॅक्टोबर हे दोन वीकेण्ड मिळणार असल्याने या दिवशी उमेदवारांना आपले मतदार घरीच सापडणार आहेत. त्यामुळे या दोन्ही दिवशी जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क साधण्यासाठी अनेक क्लृप्त्या उमेदवारांकडून लढविल्या जात आहेत. या दोन वीकेण्डव्यतिरिक्तही ९ आणि १0 आणि १३ आॅक्टोबर प्रचारासाठी उमेदवारांना मिळत आहे. कमी दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांकडून काटेकोरपणे प्रचार करतानाच त्याचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने केले जात आहे. सकाळ आणि संध्याकाळी उमेदवारांचा प्रचार रंगतानाच रात्रीच्यावेळी उमेदवारांकडून गुप्त भेटीगाठींवर भर दिला जात आहे. यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाही सामील करून घेतले जात आहे. (प्रतिनिधी)
प्रचाराचे शिस्तबद्ध नियोजन
By admin | Updated: October 9, 2014 01:56 IST