संपात सहभागी झाल्यास शिस्तभंगाची कारवाई
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या संपावर प्रशासनाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने शुक्रवार, २९ जानेवारी रोजी राज्यव्यापी लाक्षणिक संपाची घोषणा केली आहे. मात्र, नियमानुसार शासकीय कर्मचाऱ्यास संप करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्धिपत्राद्वारे कळविले आहे.
आजच्या संपात कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र व महासंघाशी संलग्न असलेल्या सर्व स्थानिक चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत. मात्र, सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा व जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरिता शासकीय कामकाज न थांबवता योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात, असे आवाहन केले आहे. तसेच, केंद्र सरकारच्या ‘काम नाही, वेतन नाही’ या धोरणाचा अवलंब राज्य सरकारही करत असल्याचे सांगत वेतनकपातीचा इशारा दिला आहे.