Join us
Daily Top 2Weekly Top 5

मीडियाकडे तक्रार केली म्हणून विद्यार्थ्यावर शिस्तभंगाची कारवाई; मुंबई विद्यापीठाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका

By रेश्मा शिवडेकर | Updated: May 31, 2024 19:52 IST

विद्यार्थ्यावर कारवाईचा बगडा उगारण्याची ही गेल्या काही वर्षातील मुंबई विद्यापीठातील दुर्मिळ घटना आहे.

मुंबई : कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अन्नाबद्दल प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याचा ठपका ठेवत मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यार्थी वसतीगृहाच्या अधिक्षकांनी पदव्युत्तरच्या (एमए) एका विद्यार्थ्याला थेट शिस्तभंगाची नोटीस पाठविली आहे. या विद्यार्थ्याने प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत असल्याचे वसतीगृह प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रसारमाध्यमांकडे तक्रार केली म्हणून एखाद्या विद्यार्थ्यावर कारवाईचा बगडा उगारण्याची ही गेल्या काही वर्षातील मुंबई विद्यापीठातील दुर्मिळ घटना आहे.

केवळ प्रसारमाध्यमांमध्येच नव्हे तर वसतीगृहाच्या अधिक्षकांच्या परवानगीशिवाय पोलिसांशीही बोलण्यास मनाई आहे. इथकेच नव्हे तर कुलगुरू, प्र-कुलगुरूंकडेही तक्रार करण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना नाही, या नियमांची आठवण अधिक्षकांनी अर्थशास्त्राच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या सिद्धांत शिंदे या विद्यार्थ्याला लेखी बजावलेल्या नोटीशीत करून दिली आहे.

आपण प्रसारमाध्यमांकडे तक्रार केली, याला पुरावा काय,  अशी विचारणा सिद्धांत शिंदे याने केली आहे. तसेच, मिडीया, पोलिसांशी आम्ही बोलायचे नाही किंवा थेट कुलगुरू, प्रकुलगुरू यांच्याकडे तक्रार करायची नाही, हे नियमच अत्यंत अतार्किक आहेत. हे नियम कशाच्या आधारे बनवले? असा प्रश्न त्याने केला आहे.

या वसतीगृहाच्या मेसमधील जेवणाच्या निकृष्ट दर्जाबद्दल, स्वयंपाकगृहातील अस्वच्छतेबाबत गेले कित्येक महिने विद्यार्थी तक्रार करत आहेत. त्यात विद्यार्थ्यांच्या अन्नात कधी झुरळ तर कधी रबरबॅण्ड, कधी माशी तर कधी डास आढळून येत असल्याने मेसमधील स्वच्छतेचा,निकृष्ट दर्जाचा प्रश्न अनेकदा ऐरणीवर आला आहे. 

सोमवारी एका विद्यार्थ्याच्या खिचडीत माशी आढळून आल्याचे वृत्त लोकमतने छायाचित्रासह प्रकाशित केले होते. विद्यार्थ्यांनी या बाबत विद्यापीठाच्या अधिक्षकांकडे लेखी, ईमेदद्वारे तक्रारी केल्या आहेत. त्यानंतरही परिस्थितीत फरक न पडल्याने पालिका, एफडीए आदी यंत्रणांकडे तर तक्रार करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेण्याऐवजी विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा का उगारला जात आहे, याबाबत वसतीगृहाचे अधिक्षक संतोष गिते यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या कारवाईचे समर्थन केले. कलिना संकुलात सध्या हे एकमेव कॅण्टीन सुरू आहे. या आणि इतर वसतीगृहातील विद्यार्थीच नव्हे तर विद्यापीठाचे कर्मचारीही या कॅण्टीनवर अवलंबून आहेत. त्यांची कॅण्टीनमध्ये मिळणाऱ्या जेवणाबद्दल तक्रार नाही. केवळ हा एकच विद्यार्थी सतत तक्रार करत असतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

वसतीगृह प्रशासनाचे पत्रातील मुद्दे- आपण वारंवार वसतिगृहातील मेस संदर्बातील बातम्या वसतीगृह अधिक्षक व विद्यापीठ प्रशासनाची परवानगी न घेता पेपरमध्ये छापून आणत आहात. यामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत आहे. - हे वसतिगृहाच्या नियमावलीचे (नियम ११,१२) उल्लंघन असून याबाबतचा योग्य खुलासा वसतीगृह अधीक्षकांकडे करावा

वसतीगृहाचे नियम ११ आणि १२ काय?- वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांना पोलिस किंवा मिडियाशी बोलण्याची परवानगी नाही. नियमानुसार त्यांना हॉस्टेलच्या परिसरात आणता येत नाही.- कुठल्याही विद्यार्थ्याला थेट कुलगुरूंची, प्र-कुलगुरू, रजिस्ट्रार आणि पोलिसांकडे तक्रार करता येणार नाही. तक्रार असल्यास ती अधिक्षकांकडेच करावी

एफडीएच्या अहवालाचे काय?एफडीएच्या टीमने महिनाभरापूर्वी येथील कॅण्टीनला भेट देत तयार भाज्या, डाळ, अंडा बिर्याणीचे नमुने ताब्यात घेतले होते. या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार होती. हे अन्नपदार्थ फूड सेफ्टी अण्ड स्टॅण्डर्ड्स अक्ट, २००६ नुसार आहेत, हे तपासले जाणार होते. मात्र हा अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे.

टॅग्स :मुंबईमुंबई विद्यापीठ