Join us
Daily Top 2Weekly Top 5

विक्रोळी स्फोटातील दोन जखमींना डिस्चार्ज

By admin | Updated: October 19, 2015 02:21 IST

विक्रोळी सिलिंडर ब्लास्ट प्रकरणात किरकोळ जखमी असणाऱ्या दोन जखमींना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर सात जणांवर राजावाडी, सायन आणि कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत

मुंबई : विक्रोळी सिलिंडर ब्लास्ट प्रकरणात किरकोळ जखमी असणाऱ्या दोन जखमींना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर सात जणांवर राजावाडी, सायन आणि कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली आहे. या स्फोटात राहुल दानवले आणि सुमन दानवले हे किरकोळ जखमी झाले होते. या दोघांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीनंतर त्यांची प्रकृती स्थिर झाल्यामुळे आज दोघांनाही डिस्चार्ज देण्यात आला. अनिकेत चौहान, सौरभ चव्हाण, तर किरकोळ जखमी झालेल्या विजय विष्णू सावंत यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली. सपना चौहान, देवगन सिंह आणि विमल चौहान या तिघांवर सध्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिघेही जास्त प्रमाणात भाजले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर, पण स्थिर असल्याची माहिती कस्तुरबा रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली. देवगन सिंह हा सुमारे ८० टक्के भाजला आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे ेसायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुलेमान मर्चंट यांनी सांगितले. (प्रतिनिधी)