Join us
Daily Top 2Weekly Top 5

इमानला पुढच्या दोन दिवसांत मिळणार डिस्चार्ज

By admin | Updated: April 26, 2017 02:27 IST

इमानची प्रकृती आता स्थिर असून अतिलठ्ठपणामुळे तिला असलेला धोका आता नाही. तिचे ‘न्यूरॉलॉजिकल रिहॅबिलिटेशन

मुंबई : इमानची प्रकृती आता स्थिर असून अतिलठ्ठपणामुळे तिला असलेला धोका आता नाही. तिचे ‘न्यूरॉलॉजिकल रिहॅबिलिटेशन’ फिजिओरेथपिस्टमार्फत करता येणे शक्य आहे. त्यामुळे इमानला रुग्णालयात राहण्याची आवश्यकता नाही. पुढच्या दोन दिवसांत तिला डिस्चार्ज देण्यात येईल, असे बेरिअ‍ॅट्रिक सर्जन डॉ. मुफ्फझल लकडावाला यांनी सांगितले. तर दुसरीकडे इमानच्या बहिणीच्या वक्तव्यामुळे दुखावल्या गेलेल्या डॉ. अपर्णा भास्कर यांनी राजीनामा दिला आहे. इमानच्या बहिणीने केलेल्या वक्तव्यामुळे दुखावलो गेलो आहोत. आम्ही इमानसाठी खूप काही प्रेमाने केले आहे. आता देवाचा इमानवर आशीर्वाद राहू दे, इतकेच म्हणू शकतो, असे डॉ. लकडावाला यांनी स्पष्ट केले. इमानची बहीण शायमाने एका व्हीडिओद्वारे डॉ. लकडावाला खोटारडे असल्याचे म्हटले आहे. ते माझ्या बहिणीची पुरेशी काळजी घेत नाहीत. इमानचे वजन १०० किलोपेक्षा कमी झालेले नाही. डॉक्टरांनी तिच्या तपासण्या करुन वर्षभर तिच्यावर रुग्णालयात उपचार होतील, असे सांगितले होते. पण, आता अवघ्या तीन महिन्यांत तिला घरी सोडण्यात येत असल्याचे शायमाने म्हटले आहे. त्याचबरोबर इमान कधीच चालू शकत नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले. इमानची प्रकृती स्थिर नाही. इजिप्तला नेल्यानंतर तिला काही झाल्यास जबाबदारी कोणाची? असा प्रश्नही तिने उपस्थित केला आहे. इमानाचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोपदेखील केला आहे. दुसरीकडे इमानच्या प्रकृतीची डॉक्टरांसह परिचारिका आणि अन्य रुग्णालय कर्मचाऱ्यांनी काळजी घेतली आहे. त्यामुळे आज ती इतकी बरी आहे. सध्या इमान कोणताही आधार न घेता अर्धा तास बसू शकते. मंगळवारी झालेल्या स्पीच थेरपीमध्ये ती चार वाक्ये बोलली. इमानची शस्त्रक्रिया झाल्यावर डॉक्टरांनी तिच्याकडे लक्ष दिले नाही, हे आरोप खोटे आहेत. सध्या ती स्वत: श्वास घेऊ शकते तिला बाहेरुन आॅक्सिजन देण्याची आवश्यकता नाही. तिला कोणतेही इंजेक्शन सध्या दिले जात नाही. पंधरा दिवसांपूर्वी इमानचे नातेवाईक तिला सोडून इजिप्तला परत जाण्याच्या तयारीत होते. त्यावेळी एकट्या इमानला सोडून जाऊ नका, असे त्यांना सांगण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीला नेहमीच फिजिओथेरपीची आवश्यकता लागते. इमान तिच्या लोकांमध्ये राहिली, तर अधिक चांगले होईल. आणि इथे उपचार होत नाहीत, तरी तिला इथेच ठेवण्याचा हट्ट नातेवाईक का करत आहेत, हे अनाकलनीय असल्याचे डॉ. लकडावाला यांचे म्हणणे आहे. रुग्णालयाव्यतिरिक्त अन्य डॉक्टरांना तपासणी करायची असल्यास परवानगी घ्यावी लागते, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले. २४ एप्रिलला इमानचे वजन करण्यात आले होते. तेव्हा तिचे वजन १७१ किलो इतके झाले होते. मी बेरिएट्रिक सर्जन आहे. न्यूरोलॉजिस्ट नाही, असेही डॉ. लकडावाला यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)