Join us
Daily Top 2Weekly Top 5

अन्वरला मिळाला डिस्चार्ज

By admin | Updated: August 25, 2015 02:59 IST

हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या अन्वरला सोमवारी डिस्चार्ज मिळाला. त्याच्यावर ३ आॅगस्टला यशस्वीरीत्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

मुंबई : हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या अन्वरला सोमवारी डिस्चार्ज मिळाला. त्याच्यावर ३ आॅगस्टला यशस्वीरीत्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. सोमवारी त्याच्या आणि कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या शस्त्रक्रियेमुळे नवसंजीवनी मिळाल्याचे मत अन्वरने व्यक्त केले. अन्वरने सांगितले, मला हृदयविकार झाल्याचे निदान झाले. त्या वेळी त्यांनी मला सांगितलेल्या आजाराचे नाव मला उच्चारतादेखील आले नव्हते. मला नक्की काय झाले आहे, हे कळले नसले तरीही मोठा आजार आहे हे नक्कीच कळले होते. त्यामुळे माझी सगळी आशाच संपली, पण, ज्या वेळी मी डॉ. अन्वय मुळे यांना भेटलो, तेव्हा माझ्या आशा पल्लवित झाल्या. त्या वेळी स्वप्नवत वाटणारी गोष्ट मी प्रत्यक्षात अनुभवत आहे.अन्वरच्या वडिलांचे डोेळे आनंदाने भरून आले होते. ते म्हणाले, एका व्यक्तीच्या शरीरातून दुसऱ्याच्या शरीरात हृदय प्रत्यारोपण करता येते, याची आम्हाला कल्पनाही नव्हती. पण, डॉक्टरांनी हे शक्य आहे, असे सांगून नेहमीच आम्हाला आधार दिला. डॉक्टरांमुळेच आज आमचा मुलगा परतला आहे. अन्वरवर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी होऊन तो घरी परतला आहे, हेच आमचे खरे यश आहे. ४७ वर्षांनी राज्यात पहिल्यांदा हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली ती ३ आॅगस्टला. मात्र खऱ्या आनंदाचा क्षण आज आहे; कारण, अन्वर यापुढे सामान्य आयुष्य जगू शकणार आहे, अशा भावना कार्डिअ‍ॅक सर्जन डॉ. अन्वय मुळे यांनी व्यक्त केली. पुढे डॉ. अन्वय मुळे यांनी सांगितले, ‘हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हे एक टीमवर्क आहे. रुग्णालयाची टीम, ट्रॅफिक पोलीस, हवाई यंत्रणा यांच्या सहकार्यामुळे आम्हाला हे शक्य झाले.’ (प्रतिनिधी)तीन महिने पथ्येतीन महिन्यांनी पुन्हा अन्वरची तपासणी करण्यात येणार आहे. या तीन महिन्यांत अन्वरने विशेष काळजी घेतली पाहिजे. घरचे अन्न त्याने खावे, अल्कोहोल घेऊ नये, मांस खाऊ नये, ताण घेऊनये, असे त्याला सांगण्यात आले आहे.रुग्णालयात केला अभ्यासअन्वर अ‍ॅनिमेशनचे शिक्षण घेतो आहे. त्याची प्रकृती स्थिर झाल्यावर त्याने पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात केली होती. रुग्णालयात तो अ‍ॅनिमेशनचे धडे गिरवत होता. लवकरच आपण सामान्य आयुष्य जगू शकतो, याचा त्याला आनंद आहे.