Join us  

निर्विघ्न गणेशोत्सवासाठी मंडळांना देणार आपत्ती प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 2:00 AM

‘मुंबई एक हादसों का शहर है’ अशी या शहराची ओळख झाली आहे़ वाढत्या आगीच्या घटनांनी सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आणला आहे.

मुंबई : ‘मुंबई एक हादसों का शहर है’ अशी या शहराची ओळख झाली आहे़ वाढत्या आगीच्या घटनांनी सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आणला आहे. त्यामुळे गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मंडळेही सतर्क झाली आहेत़ गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा यंत्रणेची फौज तैनात ठेवण्याकडे कल वाढला आहे़, तर अग्निसुरक्षेचे धडे देऊन मंडळांच्या कार्यकर्त्यांनाही सुसज्ज ठेवण्यात येत आहे़सजावट, देखाव्यासाठी बहुतांशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तींची स्थापना मंडपात केली आहे़ ११ दिवस गणरायाच्या दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भक्तांची गर्दी होणार आहे़ अशावेळी चेंगराचेंगरी, धक्काबुक्की असे अनेक प्रसंग निर्माण होऊ शकतात़ तसेच मंडपात मोठ्या प्रमाणात विद्युत रोशणाई, कापडी सजावटी, भव्य देखावे असतात़ अनेकवेळा ज्वलनशील वस्तूंचा वापर त्यात होत असतो़ संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी मोठमोठी गणेश मंडळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची नेमणूक करीत असतात़ वाहतूककोंडीमुळे मदत पोहोचण्यास अनेकवेळा विलंब होतो़ त्यामुळे भाविकांच्या जिवावर बेतू शकेल, अशी एखादी आपत्ती ओढावल्यास प्रसंगावधान राखून काय करावे? याचे प्रशिक्षण कार्यकर्त्यांना देण्यात येत आहे़ यात महापालिकेचे आपत्कालीन नियंत्रण कक्ष व मुंबई अग्निशमन दल सहकार्य करीत असते़>कार्यकर्त्यांनाही अग्निसुरक्षेचे प्रशिक्षणमुंबईत आगीच्या घटना वाढत असल्याने मुंबई अग्निशमन दलाने गणेश मंडळांनाही आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे़ त्यानुसार अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित ठेवणे तसेच बचाव कार्याचे प्रशिक्षण कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे़ सुमारे साडेतीन हजार कार्यकर्त्यांना अग्निशमन दलामार्फत प्रशिक्षण देण्यात आल्याचे गणेश गल्ली मंडळाचे पदाधिकारी स्वप्निल परब आणि स्वप्नाक्षय मंडळाचे देवेंद्र आंबेरकर यांनी सांगितले़>खासगी सुरक्षेकडे वाढता कलमुंबईत सुमारे १० हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत़ यापैकी मोठ्या मंडळांची संख्याही अलीकडे वाढत आहे़ भव्य देखावे, सजावटींमुळे या मंडळांच्या गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते़ अनेकवेळा ही गर्दी आवरणे हाताबाहेर जाते़ त्यामुळे अनेक मोठ्या मंडळांनी खासगी सुरक्षा नेमण्यास सुरुवात केली आहे़ दक्षिण मध्य मुंबईतील प्रसिद्ध गणेश गल्ली आणि वर्सोवा येथील ३८ वर्षे जुन्या स्वप्नाक्षय मंडळांनी अशी मदत घेतल्याचे सांगितले़

टॅग्स :गणेश चतुर्थी २०१८गणेशोत्सव